06 September, 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
• जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विविध आस्थापनांशी संवाद
हिंगोली, (जिमाका) दि. 06 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी व खाजगी आस्थापनांनी या योजनेत सहभागी होत युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्ह्यातील साखर कारखाने, महाविद्यालये आणि राष्ट्रीयकृत व सहकारी बँका, पतसंस्था, उद्योजक, कृषि उद्योजक, गोदाफार्म व्यवसायी, सेवा सहकारी संस्था, दवाखाना, लेबर कॉन्ट्रॅक्टर, अनुदानित व विनाअनुदानित शाळा आदींच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री. गोयल बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. ए. कादरी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक संचालक धनंजय इंगळे, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा ॲग्रणी बँकेचे प्रतिनधी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने, महाविद्यालये आणि सहकारी बँका व खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या अडचणीचे निराकरण केले. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी आस्थापनांनी या योजनेतून युवकांची प्रशिक्षणासाठी निवड करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
युवकांमधील नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही अतिशय महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून निवड करण्यात आलेल्या इयत्ता बारावी पास उमेदवाराला दरमहा 6 हजार रुपये, डिप्लोमाधारकाला 8 आणि पदवीधारकाला 10 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रत्येक उमेदवाराची निवड ही केवळ सहा महिन्यांसाठी राहणार आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. कोल्हे यांनी योजनेची सविस्तर माहिती देवून याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता केंद्रामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच विविध आस्थापनांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान केले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment