01 September, 2024

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले • जिल्हा प्रशासनाकडून अन्न- पाणी व निवा-याची सोय

*हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी* • अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याच्या प्रशासनाच्या नागरिकांना सूचना हिंगोली दि. १ : हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे हिंगोली शहरातील सखल भागात पाणी साचले. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु असून, त्यांच्या निवा-याची व अन्न -पाण्याची सोय करण्यात आली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने गेल्या २४ तासांपासून हिंगोलीसह परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला असून, जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले ओढ्यांना पूर आला असून, शेतकरी, नागरिकांनी पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नदीकाठावरील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मोठ्या धरणात पाण्याचा येवा असाच राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. हिंगोली तालुक्यातील अंभेरी येथील साठवण तलाव भरला असून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, बचाव पथक, जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाला तैनात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीपासून रविवारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनामा पाऊस थांबल्यानंतर करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. जिल्ह्यामध्ये 24 तासात सर्वाधिक पाऊस कळमनुरी तालुक्यात झाला असून, सकाळी दहा वाजेपर्यंत 59.60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागरिकांनी नाले, ओढे, तलावाच्या भागात जाण्याचे टाळावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्राचा आढावा घेण्यात आला असून, कोंढूर येथील केंद्राच्या पायऱ्यापर्यंत नदीचे पाणी आले. त्यापूर्वी सर्व साहित्य व आहार दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला आहे. शहरातील सिद्धार्थनगर, इंदिरा नगर आणि कुशल नगरातील नागरिकांसाठी खिचडीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी वैद्यकिय सेवा, रुग्णवाहिका, डॉक्टरांच्या चमूसह तैनात ठेवण्यात आल्या आहेत. स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयात नागरिकांच्या सेवेत डॉक्टरांसह वैद्यकीय पथक, मुबलक औषधीसाठा, किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले आहे. शहरातील जीनमाता नगर, बांगर नगर, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा, डिग्रस, कोंढूर येथेही पाऊस खानापूर ते ईसापूर अंभेरी रोडवर पुराचे पाणी आले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच सावरखेडा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या ८ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. *****

No comments: