18 September, 2024

जिल्हा प्रशासनाकडून ‘ई-पीक पाहणी’साठी अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर

• गावातील युवकांची मदत घेण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे निर्देश हिंगोली (जिमाका),दि.18 : जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला अतिवृष्टीने शेती आणि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या शेती आणि पिकांच्या नुकसानीचे सर्व्हे करण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी ‘ई-पीक पाहणी’ करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत. या विशेष मोहिमेत कमीत कमी वेळेत ई-पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने गावातील शिक्षित युवकांची मदत घ्यावी. या युवकांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द तर वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी तालुक्यातील गिरगाव येथे या विशेष मोहिमेमध्ये शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची प्रात्यक्षिके करून दाखवत मार्गदर्शन केले. सप्टेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यातील सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यामुळे हिंगोलीसह ग्रामीण भागात नदी-नाल्यांच्या काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये अनेक शेतकरी-शेतमजूर पुराच्या पाण्यामुळे शेती-आखाड्यावर अडकून पडले होते. वेळीच जिल्हा प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत मिळाल्यामुळे त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या अतिवृष्टीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यानंतर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी पुरबाधित गावांचा दौरा करून बाधितांना धीर देत पंचनामे पूर्ण होताच शासनाकडून तात्काळ मदत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे सांगितले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सर्वत्र जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी चमूसह ‘ई-पीक पाहणी’ करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्याचे दिसून येत आहे. यावेळी गिरगावच्या मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, वसमतचे राजु क्षीरसागर, तलाठी वंदना म्हस्के, पालीस पाटील श्री. शिवनकर, सरपंच श्रीमती पी. पी. नागरे यांच्यासह शेतकरी बांधवांची यावेळी उपस्थिती होती. *******

No comments: