10 September, 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी विशेष शिबिराचे आयोजन करुन अर्ज भरुन घ्या- जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली, दि. 10 (जिमाका): जिल्ह्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शहरी भागात प्रभागनिहाय व ग्रामीण भागात गावनिहाय विशेष आरोग्य शिबिरे घेऊन त्यांची तपासणी करावी. तसेच त्याना आवश्यक असणाऱ्या साहित्यासाठी अर्ज भरुन घ्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज ऑनलाईन बैठकीत दिले.
आज मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेऊन योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व मुख्याधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वांइकल कॉलर इत्यादी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट लाभ वितरणाद्वारे (डीबीटी) 3 हजार रुपयाच्या मर्यादेत निधीचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभाग, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी समन्वय ठेवून प्रत्येक गावनिहाय व शहरातील प्रभागनिहाय आरोग्य शिबीरे घेऊन त्यांच्यासाठी आवश्यक उपकरणाची गरज ओळखून तपासणी करावी. त्यांना आवश्यक असणाऱ्या उपकरणासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अनुदान देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज भरुन घ्यावेत. त्यांना द्यावयाच्या लाभाचा उल्लेख असलेली यादी तयार करुन मंजुरीसाठी समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आतापर्यंत 6 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळण्यासाठी थोडेसे मायबापासाठी या उपक्रमातील यादी तपासून त्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येईल. पात्र लाभार्थ्यांकडून प्राप्त अर्ज ऑनलाईन अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.गोयल यांनी यावेळी दिल्या.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment