27 September, 2024

वसंतराव नाईक महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा

हिंगोली (जिमाका), दि. 27 : विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची उप कंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंउळ, पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत वैयक्तीक कर्ज बँक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना ऑनलाईन राबवल्या जातात. या योजनांशी संबंधित सर्व माहिती महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच बीज भांडवल कर्ज योजना व थेट कर्ज योजना या दोन्ही योजना ऑफलाईन राबविण्यात येत असून थेट कर्ज योजनेची अर्ज विक्री (अर्ज विक्री किंमत 10 रुपये) जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय रुग्णालयाजवळ, हिंगोली येथे सुरु आहे. कर्ज मागणी अर्ज फक्त अर्जदारासच विक्री करण्यात येणार असून त्यांच्याकडूनच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यस्थामार्फत अर्ज विक्री व स्वीकृती होणार नाही याची नोंद घ्यावी. थेट कर्ज योजनेचा अर्ज घेताना आधार कार्ड, जातीचा दाखला व शिधा पत्रिका सोबत ठेवणे अनिवार्य आहे. तसेच ज्या अर्जदाराने व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण प्राप्त केले आहे त्यांना व विधवा, निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येईल. हिंगोली जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींनी महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. *******

No comments: