28 September, 2024

शौर्य दिनाचे सोमवारी आयोजन

हिंगोली(जिमाका),दि.२८ : भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकव्दारे दि. २९ सप्टेंबर, २०१६ रोजी दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि.२९ सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो. आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे आणि सार्वभौमत्वाचे प्राणपणाने रक्षण करणारा, आपत्तीच्या काळात आपद्ग्रस्त देशबांधवांच्या मदतीलाही धावून जाणारा, उन्हातान्हाची, थंडीपावसाची वा कोणत्याही अडचणीची पर्वा न करता आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारा देशाचा बहादूर सैनिक हा आपल्या सर्वाच्या आदराचा आणि अभिमानाचा विषय आहे. परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी व देशाचे स्वातंत्र्य राखून आपल्या पाठीशी भक्कमपणे अहोरात्र उभ्या राहणाऱ्या या सैनिकांचे आपल्यावर फार मोठे ऋण असते. या शौर्य दिनाच्या प्रसंगी सैनिकांप्रती असलेली आदराची भावना समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी शौर्य दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे सोमवार, दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, शहीद जवांनाचे कुटुंबीय वीर माता, वीर पिता, वीर पत्नी या सर्वांनी शौर्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. ******

No comments: