02 September, 2024
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री अब्दुल सत्तार
• पालकमंत्री आज देणार नुकसानग्रस्त गावांना भेट
• शेतक-यांना धीर देण्याचे काम करा
• नुकसान भरपाईच्या आवश्यक निधीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार
• जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून पंचनामे पूर्ण करावेत
• प्रत्येक गावात एक कर्मचारी नेमा
• पंचनामे करताना सूक्ष्म नियोजन करा
• एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये
• अंदाजे २ लाख ४९ हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान
• पूरग्रस्त भागात आरोग्यविषयक आजार होणार नाहीत, यासाठी खबरदारी घ्या
• जिल्ह्यात सर्व मंडळात अतिवृष्टी
• सर्व अधिकारी -कर्मचा-यांना क्षेत्रीय स्तरावर सक्रिय करा
हिंगोली (जिमाका),दि.०२: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत. यामध्ये एकही बाधित व्यक्ती पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. तसेच त्यांना तात्काळ दिलासा देता येईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांच्यासह जिल्हा प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात तहसील स्तरावरील विविध पथकांमार्फत नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा प्राथमिक अहवालाचा प्रस्ताव तातडीने नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठवावा. जिल्ह्यातील बाधितांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. शासन निर्णयान्वये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिक नुकसानीचे विहित पद्धतीने पंचनामे करण्याचे स्थायी निर्देश आहेत. त्यानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी विविध यंत्रणेनुसार तातडीने पंचनामे सुरू करावेत. या कामासाठी आवश्यकतेनुसार गटविकास अधिकारी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी व इतर तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी यांची पथके गठीत करून पंचनामे कालमर्यादेत पूर्ण करावेत व एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
जिल्ह्यात काही गावामध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले. त्या सर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांच्या अन्न-पाणी आणि निवाऱ्याची सोय करावी. पाऊस आणि पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागातील शेती, घरे, व जनावरांचे तातडीने पंचनामे सुरु करावेत. या अतिवृष्टीमध्ये जीवित व वित्तहानीची परिपूर्ण माहिती तयार करावी. तसेच मदतीची आवश्यकता असलेल्या ठिकाणी तातडीने मदत पाठविण्याची व्यवस्था करावी. तसेच महावितरण विभागाने खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याची प्राधान्याने आणि तात्काळ कार्यवाही करावी. तसेच वीज उपकेंद्र, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये पाणी शिरले आहे, त्या ठिकाणचे पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा उद्या मंगळवार (दि.3) रोजी पालकमंत्री अब्दुल सत्तार हे आडगाव, सावरखेडा, सोडेगाव, डोंगरगाव पूल येथे नुकसानीची पाहणी करणार आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, वसमत तालुक्यातील टेंभूर्णी येथील सुभाष बाबुराव सवंडकर (३८) हा व्यक्ती नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मयत झाला. तर आज सायंकाळी औंढा नागनाथ तालुक्यातील सारगवाडी येथील संजय ठोंबरे (वय ३३वर्षे) व चैतन्या ठोंबरे (वय १० वर्षे) हे दोघेजण नाल्याच्या पाण्यात वाहून गेले आहेत. तसेच जिल्ह्यातील अंदाजे २ लाख ४९ हजार ८३९ हेक्टरवरील शेतीपिकाचे तर ५६ पशुधनाचे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील विविध भागात नदीच्या पुरामुळे अडकून पडलेल्या ८७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबातील २१८ नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले असून, त्यांचे निवास आणि भोजनव्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. तसेच टाकळगव्हाण आणि कोंढूर या दोन गावाचा संपर्क तुटला होता. तर राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्ग प्रत्येकी ९ असे एकूण १८ मार्ग बंद पडले आहेत. तसेच जिल्हा परिषदेचा १ रस्ता बंद पडला असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पालकमंत्री श्री. सत्तार यांना यावेळी सांगितले. उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment