28 September, 2024
हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये 2 कोटी 35 लाख 48 हजार 175 रुपयांची 128 प्रकरणे निकाली
* अपंग पक्षकाराची बाजू समजून घेण्यासाठी न्यायाधीश उतरले पॅनलवरुन खाली
हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये आज दि.28 सप्टेंबर, 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 1130 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व 3090 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित 108 व वाद दाखलपूर्व 20 असे एकूण 128 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात तडजोडी आधारे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 2 कोटी 35 लाख 48 हजार 175 रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आले.
या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेली पाच पॅनल तयार करण्यात आले होते.
या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायाधीश-1 आर. व्ही. लोखंडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 पी. जी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती व्ही. व्ही. सावरकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आय. जे. ठाकरे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी. आर. पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. या लोकअदालतीला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवशंकर साबळे, सचिव ॲड. अजय वानखेडे, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
*अपंग पक्षकाराची बाजू समजून घेण्यासाठी न्यायाधीश उतरले पॅनलवरुन खाली*
या लोकन्यायालयामध्ये पुजा नागनाथराव पोतदार वय 22 वर्षे या तरूणीचा दि. 04 नोव्हेंबर, 2019 रोजी अकोला बायपास टी पॉईन्ट येथे झालेल्या स्कुटी व ट्रकच्या अपघातात तिचा एक पाय कायमचा गमावला होता. त्यामुळे तिला चालता येत नाही. वरील मजल्यावर पोहचणे शक्य होत नसल्याने हिंगोली जिल्हा न्यायालयामधील जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे व तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी.जी. देशमुख यांनी स्वतः पॅनलवरुन खाली उतरुन जिल्हा न्यायालयाच्या इमारती समोरील आवारात उभ्या असलेल्या वाहनामध्ये बसलेल्या पूजा नागनाथराव पोतदार या अपंग तरुणीच्या जवळ जाऊन त्यांची बाजू ऐकूण घेतली. तसेच त्या प्रकरणामधे 20 लाख नुकसान भरपाई रक्कमेवर तडजोड करुन प्रकरण निकाली काढण्यात आले. अर्जदार "पुजा नागनाथराव पोतदार" हिची बाजु ॲड. एस.बी.गडदे यांनी मांडली.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment