05 September, 2024

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

हिंगोली (जिमाका), दि. 05 : हिंगोली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण दि. 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर, 2024 या कालावधीत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. तसेच दि. 16 सप्टेंबर, 2024 रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. या सण, उत्सव काळात जिल्ह्यात शांतता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. परंतु या काळात शुल्लक कारणांवरून अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते. या अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यांसोबत 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये केली आहे. या कालावधीत शहरी व ग्रामीण भागातील हा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. हिंगोली शहर पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पी. एन. रुषी, नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी नायब तहसीलदार अशोक भोजने, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार कोकरे, वसमत शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमतचे नायब तहसीलदार डॉ. विनोद मारोतराव डोनगावकर यांची नियुक्ती केली आहे. हट्टा व कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे नायब तहसीलदार दामोदर नागोराव जाधव, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीचे नायब तहसीलदार बालाप्रसाद धूत यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी नायब तहसीलदार देवराव कारगुडे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनिल सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त दंडाधिकाऱ्यांची त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत जिल्ह्यात विविध सण उत्सव काळात विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत. *****

No comments: