06 September, 2024
बालकांशी निगडीत विविध विषयावर जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 06: जिल्हा बाल सरंक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाइन 1098 कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकांशी निगडीत विविध विषयावर हिंगोली येथील सरस्वती विद्या मंदिर येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श, बालविवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बाल विवाह होण्याची कारणे कुटुंबाचे स्थलांतर,आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील मुलीचे प्रमाण, वडिलांचे व्यसन, किशोरवयीन मुलामुलीच्या हातून होणाऱ्या चुका इत्यादी बालविवाह होण्याचे प्रमुख कारणे आहेत. परंतु बालविवाह केल्याने होणाऱ्या दुष्परिणामाचा सामना मुलगा-मुलगी व त्यांचे कुटुंब यांना करावा लागतो, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे.
या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहे. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाहीत, याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच मुलीच्या वयाची 18 व मुलाच्या वयाची 21 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे, अशी माहिती चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी दिली आहे.
तसेच माता मृत्युचे प्रमाण, कुपोषित मूल जन्माला येणे, त्यावर उपपाययोजना म्हणून मुलीना शिक्षण देणे आवश्यक आहे. मुलींनीही आपल्या पालकांना विश्वासात घेऊन शिक्षण पूर्ण केले पाहिजे, आपल्या सभोवताली कुठेही बालविवाह होत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिली पाहिजे. ही हेल्पलाईन बालकांकरीता तात्काळ मदत करणारी आहे. या क्रमांकावर मिळालेली माहिती गोपनीय असते. बालकाला मदतीची गरज भासल्यास 1098 या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधावा, अशी माहिती -केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी दिली.
बालक म्हणजे काय, बालकांचे हक्क व अधिकार याबाबत तसेच बालकांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी समुदायातील लोकांनी पुढाकार घेऊन माहिती दिली पाहिजे. बालविवाह निर्मूलन अधिनियम 2006 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून बालविवाह जनजागृती बाबत प्रतिज्ञा समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी दिली.
यावेळी चाईल्ड हेल्पलाईन कक्षातील समुपदेशक अंकुर पाटोडे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, तथागत इंगळे, संबंधित शाळेतील मुख्यध्यापिका आशा सूर्यवाड, वंदना सोवितकर, सुनिता सोयीतकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, बालक व पालक उपस्थित होते. जिल्हा बाल सरंक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन 1098 कडून जिल्हाभरात बालकांसदर्भात जनजागृती करणे सुरू आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी दिली आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment