23 September, 2024

'भरड धान्याचा दैनंदिन आहारात समावेश करावा' • तोंडापूर येथील शेतकरी मेळाव्यात मान्यवरांचे मत

• 'कृषि सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन हिंगोली (जिमाका), दि. 23 : मानवी आहारात भरड धान्य अत्यंत महत्त्वाचे असून, प्रत्येक नागरिकांसह शेतक-यांनी आपल्या दैनंदिन आहारात भरड धान्याचे महत्त्व ओळखून त्याचा समावेश करावा, असे कृषि सप्ताहात उपस्थित मान्यवरांनी सांगितले. भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे कृषि सुवर्ण समृध्दी सप्ताह अंतर्गत शेतकरी मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव माने होते. यावेळी मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. झंवर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, बाबुराव कदम, नारायण गोरे, नागोराव करडे, डॉ. उषा कदम, तालुका कृषी अधिकारी श्री. घुगे, महेंद्र माने, डॉ. माधुरी काटकर-माने व श्री. अवचार उपस्थित होते. या कार्यक्रमास विशेष निमंत्रित नवी दिल्लीचे श्रीअन्न संचालक डॉ.राकेश कुमार सिन्हा यांनी भरड धान्य हे पोटॅशियम, झिंक व इतर विटामिन युक्त भरडधान्य असून, शेतकऱ्यांनी याचा दैनंदिन आहारामध्ये वापर करावा. त्याचबरोबर भरड धान्य हे चार महिन्यात येणारे पीक असून या पिकाला पाणी सुद्धा कमी लागते. हिंगोली जिल्हा हळद उत्पादनात अग्रेसर असून हळदीचे टॅबलेट्स उद्योग शेतकऱ्यांनी करावेत, असे आवाहन केले. हैदराबाद येथील भारतीय श्रीअन्न संशोधन संस्थानचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र चापके यांनी प्रमुख श्रीअन्न व छोटे श्रीअन्न कोणते व श्रीअन्नचे नऊ प्रकार, त्याच बरोबर विविध राज्यांमध्ये असलेले श्रीअन्नाचे क्षेत्र व उत्पादनाविषयी माहिती दिली. तसेच अनियमित पाऊस, बदलते वातावरण लक्षात घेत शेतकऱ्यांनी श्रीअन्नाची लागवड करावी. श्रीअन्नामुळे आर्थिक बाजू, आर्थिक सुरक्षा व चारा पौष्टिकता मिळते. त्याच बरोबर शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या सल्ल्याने शेती निगडित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,असे आवाहन केले. मिलेट मॅन ऑफ तेलंगणा वीरशेटी पाटील यांनी मेरा गाव मेरा दुकान संकल्पना सर्व शेतकऱ्यांनी राबवावी. प्रत्येकाने आपल्या रोजच्या आहारामध्ये 50 ग्रॅम भरड धान्यचे सेवन करावे, असे आवाहन केले. परभणी येथील ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.एल.एन. जावळे यांनी परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी शक्ती, परभणी सुपर मोती या वाणाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. रब्बी ज्वारी उत्पादन वाढीसाठी प्रमुख पंचसूत्रे व शेतकरी बांधवांनी 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान रब्बी ज्वारीची लागवड करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव माने यांनी पूर्वी हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्वारी हे मोठ्या प्रमाणात होत होती. सध्या शेतकरी प्रमुख पीक म्हणून हळद व सोयाबीन घेत आहेत. शेतकऱ्यांनी आर्थिक व आरोग्य सुरक्षेकडे बघता भरड धान्य उत्पादनाकडे वळणे गरजेचे आहे. सध्या बदलते हवामानामध्ये भरडधान्य हे पीक शेतकऱ्याना योगदान ठरू शकेल. सद्यस्थितीत खताचा व कीटकनाशकाच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा आरोग्य बिघडत चाललेला आहे. याकरिता योग्य वेळेतच मृदा व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करावे, सांगितले. यावेळी प्रास्ताविकात तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ.पी.पी.शेळके यांनी भरड धान्याचे महत्त्व, दैनंदिन आहारामध्ये त्याचे फायदे व त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ विषयी माहिती दिली. या कार्यक्रमांमध्ये भरड धान्य उत्पादन आणि प्रक्रिया व शेळीपालन या घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे उपलब्ध बियाणे व इतर शेती उपयोगी निविष्ठामध्ये ज्वारी परभणी शक्ती, ज्वारी परभणी मोती, ज्वारी परभणी सुपर मोती, ज्वारी परभणी वसंत हुरडा, हरभरा बियाणे, जीवामृत, ट्रायकोडर्मा, मेटाराझीहयम व टर्मरिक बुस्टर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. तसेच अनेक शेतकऱ्यांचे सुद्धा स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र यांनी केले. या कार्यक्रमास पत्रकार, कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अनेक गावातून शेतकरी, महिला शेतकरी, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

No comments: