10 September, 2024

वसमत येथे जिल्हास्तरीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळा संपन्न

हिंगोली, दि.10(जिमाका): जिल्ह्यातील हळद लागवडीचा वाढता पेरा लक्षात घेता, हळदीसाठी स्वतंत्र बोर्डाची स्थापना करण्यात आली असून, वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रात द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा व जिल्हास्तरीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळा नुकतीच पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची तर प्रमुख उपस्थिती हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कदम, डॉ. विजय काळे, डॉ. अनिल ओळंबे यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील हळदीला ‘वसमत हळद’ जीआय नामांकन मिळवून देण्यात आले आहे. आता शेतकरीच हळद लागवड उत्पादनातून समृद्ध शेती करत, दुप्पट उत्पन्न वाढवून जिल्ह्यात "हळद क्रांती" घडविण्यासाठी जागृत झाला आहे. त्याला वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण व संशोधनातून उत्पन्न वाढवत, शेतकरी आर्थिक प्रगती साधत असल्याचे जिल्हास्तरीय शेतकरी कार्यशाळेत हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा माजी खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. हळदीमुळे वसमत जागतिक नकाशावर-जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी त्यांचा नात्यातील ज्येष्ठासोबत आलेला अनुभव हरिद्रा संशोधन केंद्राच्या द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थिताना सांगितला. जगातील सर्वात चांगली हळद कुठे मिळते, असे विचारले असता, त्यांना दक्षिण आफ्रिकेतील मेटागास्कन येथे सांगण्यात आले होते. त्या ठिकाणी नातेवाईक गेले असता, तेथील कृषी तज्ज्ञांनी सांगितले की, आमच्याहीपेक्षा चांगली हळद ही तुम्हाला भारतातील हिंगोली जिल्ह्यात मिळेल. या अनुभवावरून हळदीमुळे वसमत हे जागतिक नकाशावर आले असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. राजेंद्र कदम यांनी प्रास्ताविकात हरिद्रा केंद्राच्या कामकाजाची माहिती दिली. डॉ. विजय काळे, (अकोला कृषी विद्यापीठ) यांनी कीड नियंत्रण व पीक व्यवस्थापन यासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. अनिल ओळंबे यांनी आपल्या भागातील विषमुक्त हळद जागतिक स्तरावर नेण्यासाठी संशोधनाची गरज व्यक्त केली. तसेच शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, सनदी लेखापाल जीवन लाभशेटवाळ यांनी हरिद्रा केंद्रातील विविध कामकाजाचा अहवाल शेतकऱ्यांसमोर सादर केला. प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील नारायण मारुतीराव दळवी, मालेगाव येथील भगवान इंगोले, जितेंद्र गोविंदराव, कुरुंदवाडी येथील बसवेश्वर नारायण काष्टे, कवठा येथील श्रीदर्शन शंकरराव खराटे, प्रल्हाद बोरगड, मधुकरराव जाधव जामठीकर या शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधली. त्यामुळे त्यांचा हरिद्रा केंद्राच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन नेव्हल तर आभार रमेश देशमुख यांनी मांडले. जिल्हास्तरीय शेतकरी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रमेश देशमुख तंत्र अधिकारी, शिवाजी शितोळे, तंत्र अधिकारी शिवाजी राचेवाड, कृषि अधिकारी नितीन देशपांडे, कृषि अधिकारी पंकज कदम, तंत्र सहायक दिपाली गायकवाड, विठ्ठल कावरखे व हरिद्रा संशोधन केंद्राचे कर्मचारी व संचालक यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिवाजी काकडे, संभाजी सिद्धेवार, लक्ष्मीनारायण मुरक्या, श्रीमती प्रतीक्षा पतंगे, श्रीमती सुनंदा पोळ यांच्यासह संचालक व प्रगतशील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. ******

No comments: