05 September, 2024
नवउद्योजक लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील उद्योजकांना आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 05 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष शासन साजरे करीत असताना यामध्ये केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे . या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिस्स्यामधील 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.
यासाठी योजनेचा लाभ स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल. संबंधित लाभार्थ्यांने आयुक्त , समाज कल्याण, पुणे यांच्या नावे अनुदानासाठी मागणीपत्र विहित विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक कर्ज खात्याचे विवरणपत्र प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी इच्छूक पात्र नवउद्योजकांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी विहित नमुन्यात तीन प्रतीत प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment