23 September, 2024

"स्वच्छता ही सेवा" उपक्रमातून एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी हजारो हाताने केले सार्वजनिक ठिकाणाच्या स्वच्छतेसाठी श्रमदान

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि. 19 ते 21 सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक ठिकाणाची श्रमदानातून साफसफाई केली. जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थांच्या पुढाकारातून थेट गावात जाऊन "एक दिवस गावासाठी" या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात श्रमदानात सहभाग घेतला . जिल्हाधिकारी अभिनव गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या आदेशानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) संजय कुलकर्णी यांच्या सनियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता ही सेवा अंतर्गत श्रमदान मोहीम जिल्ह्यातील सर्व महसूल व जिल्हा परिषदेचे अधिकारी, विभाग प्रमुख तसेच पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व प्राध्यापक, शिक्षक, ग्रामसेवक, गट समन्वयक कर्मचारी सहभागी होऊन ग्रामस्थाच्या मदतीने सर्व ग्रामपंचायतीमध्ये श्रमदानातून सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी परिसरात स्वच्छता तसेच नदी घाट परिसरात स्वच्छता करुन या सर्व ठिकाणाची श्रमदानातून साफसफाई करण्यात आली. स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. आईच्या नावाने एक झाड हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला सदस्य, महिला बचत गटातील सदस्य, रोजगार सेवक, शाळेचे विद्यार्थी , गावातील व्यायाम मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, भजनी मंडळ, युवा क्रीडा मंडळ आदींचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात आला. *******

No comments: