09 September, 2024

दोन दिवसात पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठवा - मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

*
हिंगोली, दि.०९ (जिमाका): जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी बाधित भागांच्या नुकसानीचे दोन दिवसात पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठविण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले. वसमत तालुक्यातील माळवटा, किन्होळा आणि कुरूंदा येथील अतिवृष्टी बाधित भागाची पाहणी आज मंत्री श्री. पाटील यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषद सदस्य राजेश विटेकर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.जी. पोत्रे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, तहसीलदार शारदा दळवी, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. *आसना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करणे आवश्यक - गावक-यांची मागणी* आसना नदीच्या पुराचे पाणी किन्होळा गावात शिरल्यामुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड, पाळीव पशुधनही या पुरात वाहून गेले आहे. तसेच ठिबक, तुषार सिंचन संचासह आखाड्यावरील कृषि साहित्यसुद्धा वाहून गेले आहे. कुरुंदा तसेच किन्होळा आदी आसना नदीकाठावरील गावांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, तसेच संरक्षण भिंत बांधणे आवश्यक असल्याचे किन्होळावासीयांनी मंत्री श्री. पाटील यांना सांगितले. याकामी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कुरुंदा येथील शेतकरी शामराव दळवी यांच्या शेतात थांबून त्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते शेतक-यांशी बोलत होते. शेती पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईची अग्रीम रक्कम लवकरच वितरीत करण्यात येईल, असे सांगून या नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे पूर्ण करून त्याचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा यंत्रणेला दिलेत. *******

No comments: