20 September, 2024

ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून बाल विवाह निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवावेत - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

• जिल्हा संरक्षण कक्षाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा हिंगोली, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करावी किंवा असलेल्या समितीचे पुन:र्गठन करावेत. तसेच ग्राम बाल संरक्षण समितीची दरमहा बैठक घ्यावी. तसेच बालविवाह निर्मूलनासाठी निवडण्यात आलेल्या 50 गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी महिला व बालविकास आणि पंचायत विभागाला दिल्या. बालविवाह निर्मूलन कृती दलाची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, पोलीस निरीक्षक शालिनी नाईक, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी विलास जगताप, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. टी. आर. हापगुंडे, युनिसेफ एसबी-3 चे नंदू जाधव, मोनाली धुर्वे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर, जिल्हा संरक्षण अधिकारी माया सूर्यवंशी, परीविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल न्याय मंडळ सदस्य वर्षा कुरील, बाल न्याय मंडळाचे प्रतिनिधी अशोक खुपसे, उज्वल पाईकराव धनेंद्र कांबळे, संदीप कोल्हे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील निवडक 125 शाळेत बालविवाह निर्मूलनासाठी घेण्यात येत असलेल्या विद्यार्थी सक्षमीकरण व पालक जागरुकता सत्रास केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी यांनी भेटी द्याव्यात. सक्षम युवा शक्ती कार्यक्रमासाठी निवड केलेल्या 50 गावात ग्राम बाल संरक्षण समिती सक्षम करून कार्यान्वित करण्यात यावी. तसेच या 50 गावासाठी एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग यांनी एकत्रित सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करावा. महिनानिहाय विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे. ग्राम बाल संरक्षण समितीकडून याची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन घ्यावी. ही 50 गावे तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांना दत्तक द्यावी. तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांचे बालविवाह निर्मूलन कृती आराखड्याबाबत प्रशिक्षण आयोजित करावे. स्थलांतरित कामगारांसाठी गावात रोजगार प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अति जोखिम कुटुंबातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातून युवा प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती द्यावी. राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने या 50 गावात जनजागृती करण्यात यावी. शाळेत जाण्यासाठी मुलींना वाहनाची सुविधा उपलब्ध नसलेल्या गावांची माहिती घेऊन त्या ठिकाणी मानव विकास मिशन बस सुरु करण्यासाठी काम करावे, असे निर्देशही श्री. गोयल यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. मगर यांनी बाल संरक्षण कक्षाने राबविलेले विविध उपक्रम, कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी, मिशन वात्सल्य, प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व योजनाचा लाभ, बालसंगोपन योजना, चाईल्ड हेल्पलाईन, वन स्टॉप सेंटरच्या कामकाज आदी विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. ******

No comments: