12 September, 2024
प्राधान्यक्रम ठरवून उल्लेखनीय कामांचे प्रस्ताव सादर करावेत - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
* जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
हिंगोली (जिमाका),दि.12: प्रत्येक विभागाने जिल्हा वार्षिक योजनेची कामे प्राधान्यक्रम ठरवून उल्लेखनीय कामांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आयोजित आढावा बैठकीत दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर येथे विकास कामांची आढावा बैठक घेणार असून, सर्व विभागप्रमुखांनी महत्त्वाच्या योजनांचे विभागामार्फत नाविन्यपूर्ण तसेच विशेष ओळख निर्माण करणाऱ्या बाबींसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी केल्या.
जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने तयार झालेल्या नवीन इमारतीमध्ये कार्यालय सुरु करावे. तसेच नवीन पशुसवंर्धन दवाखाने व पशुवैद्यकीय चिकित्सालये तयार करण्यासाठी योग्य नियोजन करुन सविस्तर प्रस्ताव सादर करावेत. वन विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी आदर्श वन उद्यान उभारण्यासाठी आराखडा सादर करावा. तसेच शाळेच्या वर्ग खोल्या दुरुस्त्या, नवीन बांधकाम, शाळेत मुलींसाठी शौचालय, सीसीटीव्ही, तसेच आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधाची कामे प्राधान्याने करावेत. प्रत्येक शाळेत कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याची यादी तयार करुन प्रत्येक शाळेला द्यावी. त्यामुळे सर्व शाळांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करता येतील. तसेच क्रीडा विभागाने जिल्ह्यातील सर्व मोठ्या शाळांमध्ये क्रीडा साहित्य उपलब्ध करुन द्यावेत. कौशल्य विकास विभागाने मागणीनुसार विविध विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करावे. सन 2023-24च्या कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने सादर करावे तसेच झालेल्या कामांचे छायाचित्र आयपास प्रणालीवर अपलोड करावेत. प्रत्येक आरोग्य केंद्रावर ‘आयुष्यमान भारत’च्या निकषानुसार सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना केल्या.
यासोबतच जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी मृद व जलसंधारण, पशुसंवर्धन, मत्स्य विभाग, वनीकरण विभाग, जलयुक्त शिवार, पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना, पाटबंधारे, पूरनियंत्रण, क्रीडा, पाणीपुरवठा, स्वच्छता, नगरविकास, पर्यटन, ऊर्जा, महिला व बालकल्याण, रस्ते व पूल, पर्यटन विकास आदी विविध योजनांसह अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांचा आढावा घेऊन सूचना केल्या.
आकांक्षित तालुका अंतर्गत संपूर्णत: अभियानांतर्गत ठरवून दिलेल्या 6 निर्देशांकाचे दिलेले उद्दिष्ट 30 सप्टेंबर अखेर पूर्ण करावेत. तसेच आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावेत. यासाठी प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नेमून दररोज पोर्टलवर जाऊन अर्जाची सद्यस्थिती पाहून त्यानुसार कार्यवाही करावी. तसेच वयोश्री योजनेचे प्राप्त अर्ज अपलोड करण्याचे काम तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना केल्या.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment