18 September, 2024
‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान’ बाबीअंतर्गत सोयाबीन पिक विम्यासाठी 25 टक्के अग्रीम
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार क्षेत्रीय संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्व महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकामध्ये मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत असल्याने संबंधित विमा धारकांना पिक नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या 25 टक्के अग्रीम देण्याचे आदेश सोमवारी पारित केले आहेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान ही जोखीम लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा कमी आल्याचे निदर्शनास आले आहे. तर तूर व कापूस पिकांच्या नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट दिसून आली नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-2023 ते रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबविण्याबाबत दि. 26 जून, 2023 च्या शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नुकसानीचा अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत वरील तरतुदीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल.
उपरोक्त बैठकीतील चर्चेनुसार तसेच प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एचडीएफसी ईरगो कंपनी लि. यांना जिल्हास्तरीय संयुक्ती समितीच्या मान्यतेने जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment