23 September, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत खाजगी आस्थापनांमध्ये तात्काळ नियुक्त्या देण्याचे निर्देश

हिंगोली (जिमाका), दि. 23 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी खासगी आस्थापनांमध्ये त्यांना शिकाऊ प्रशिक्षणार्थी तात्काळ नियुक्ती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत खाजगी आस्थापनांमध्ये नियुक्ती देण्यासाठी आरोग्य, शिक्षण, व्यवसाय शिक्षण, उद्योग, एमआयडीसी, बँक, वस्तू व सेवा कर, कृषी आदी विविध विभागाची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कदम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विशाल रांगणे,कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, डॉ.बालाजी भाकरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यातील खाजगी उद्योग, कंपनी, कृषी उद्योग, गोदाफार्म, व्यवसाय, खाजगी अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, विद्यालय, महाविद्यालये या आस्थापनांमध्ये हे प्रशिक्षणार्थी काम करू शकणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून इच्छूक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होणार आहे. तसेच उद्योजकांना त्यांच्या कामासाठी लागणारे मनुष्यबळ या योजनेद्वारे 6 महिने कालावधीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी आस्थापनामध्ये नियुक्ती देण्यासाठी आरोग्य, शिक्षण, आयटीआय, व्यवसाय शिक्षण, उद्योग, एमआयडीसी, बँक, वस्तू व सेवा कर, कृषी आदी विविध विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांनी आपणाशी संबंधित खाजगी आस्थापनांशी संपर्क साधून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची नियुक्ती करावी. यासाठी प्रत्येक आस्थापनामध्ये भरावयाच्या जागेची यादी तयार करुन तात्काळ नियुक्त्या द्याव्यात. तसेच यापूर्वी नियुक्ती देण्यात आलेल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीची नोंद तातडीने संकेतस्थळावर ऑनलाईन भरुन अद्ययावत करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी दिले. *****

No comments: