05 September, 2024
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज आमंत्रित
हिंगोली, (जिमाका) दि. 05 : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी धनगर समाजातील असावा, इयत्ता 12 वीमध्ये किमान 60 टक्के गुण असावेत, 12 वी नंतर मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा, जात वैधता प्रमाणपत्र जोडावे, पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे, शैक्षणिक संस्था असलेल्या शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा, विद्यार्थी हा हिंगोली शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा, धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील.
लाभार्थी निवड करताना उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून दि. 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्याची निवड यादी दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांकडून दि. 15 ऑक्टोबर, 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्याची निवड यादी दि. 30 ऑक्टोबर, 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांस ऑफलाईन पध्दतीने सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील, असे आवाहन यादव गायकवाड, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment