26 September, 2024
महाज्योती’ देणार सावित्रीच्या लेकींना स्व-संरक्षणाचे धडे ! केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिल सोबत ‘महाज्योती’चा करार
हिंगोली (जिमाका), दि. 26 : देशात निर्भीडपणे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविण्याचे मोलाचे कार्य क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) काम करीत आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच जीवनावश्यक कौशल्ये देखील अत्यावश्यक आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना जीवनाच्या स्पर्धेत स्वावलंबी होण्यास मदत होते. त्यातील सुरक्षा व आरोग्य हा देखील महत्वाचा घटक आहे. त्याच अनुषंगाने महाज्योती संस्थेने महाविद्यालयात शिकणाऱ्या सावित्रीच्या लेकींना स्व-संरक्षण व योगाचे प्रशिक्षण देण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. महाज्योतीने केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिल सोबत याबाबत सामंजस्य करार केलेला आहे. या करारावर महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले व स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीन झहीद यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी महाज्योतीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे व प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे उपस्थित होते.
महाज्योती संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध सेक्टर स्कील कौन्सिल मार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येते. त्यातील स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिल मार्फत जीवनावश्यक कौशल्ये देण्याबाबत महाज्योतीने अभिनव पाऊल उचलले आहे. या प्रशिक्षणामुळे महाविद्यालयीन मुला-मुलींना स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिलच्या अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यात प्रात्यक्षिकांचा देखील सहभाग असणार आहे. प्रशिक्षणाअंती परीक्षा घेण्यात येणार असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एनएसडीसी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना स्व-संरक्षणासोबत स्वत:ला फिटनेस किंवा सेल्फ डिफेन्स कोच म्हणून व्यवसाय देखील सुरु करण्यासाठी मदत होणार आहे.
प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे मंत्री अतुल सावेंचे आवाहन
‘महाज्योती’ मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कायम अभिनव प्रशिक्षण देणे व त्यातून त्यांचे जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या सेल्फ डिफेन्स प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.
प्रशिक्षणाचे वैशिष्टे :
1) मोफत 150 तासांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक, 2) प्रशिक्षणासाठी मान्यताप्राप्त अनुभवी व दर्जेदार प्रशिक्षक, 3) प्रशिक्षणानंतर एन.एस.डी.सी.चे प्रमाणपत्र, 4) फिटनेस किंवा सेल्फ डिफेन्स कोच म्हणून व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment