13 September, 2024

कृषि सुवर्ण समृध्दी आठवडा निमित्त तोंडापूर कृषि विज्ञान केंद्रामध्ये 23 सप्टेंबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 13 : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्रात दि. 23 सप्टेंबर, 2024 रोजी कृषि सुवर्ण समृध्दी आठवडा साजरा करण्यात येणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते होणार असून या मेळाव्याला वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. इंद्रमणी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार ॲड. शिवाजीराव माने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि‌द्यापीठाचे सचालक संशोधन डॉ. खिजर बेग, ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल. एन. जावळे, मिलेट मिशन नवी दिल्ली येथून श्री राकेश सिन्हा, मिलेट मॅन ऑफ आंध्र प्रदेश श्री वीर शेट्टी व भारतीय अन्न संशोधन संस्थान, हैदराबाद येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र चापके यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी प्रदर्शनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये भरड धान्याच्या बियाण्याची विक्री सुद्धा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भरड धान्यापासून तयार होऊ शकणाऱ्या पदार्थाचे प्रदर्शन सुद्धा लावले जाणार आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून भरडधान्याचे महत्त्व मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करून सांगण्यात आलेले आहे. त्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण दशक हे भरड धान्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरे करण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा मानस आहे. या कार्यक्रमास सर्व शेतकरी आणि शेती विषयक काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यामध्ये उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये हळद सोयाबीन आणि हरभरा या पिकांसोबतच रब्बी ज्वारीचा पेरा आणि उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे. ******

No comments: