19 September, 2024
नुकसानग्रस्त खरीप पिकांच्या विमा दाव्याची पुर्वसूचना दाखल क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे विमा कंपनीला आदेश
हिंगोली (जिमाका), दि. 19 : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2024 राबविण्यासाठी शासनाने दि. 26 जून, 2023 अन्वये मान्यता दिली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 4 लाख 72 हजार 15 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये दि. 2 सप्टेंबर, 2024 रोजी अतिवृष्टी झाल्यानंतर 4 लाख 54 हजार 71 शेतकऱ्यांनी विमा दाव्याची पूर्वसूचना कंपनीकडे दाखल केल्याचे कंपनीने कळविले आहे. केंद्र शासनाच्या दि. 17 ऑगस्ट, 2020 च्या मार्गदर्शक सूचनेतील तरतुदीप्रमाणे जिल्ह्यातील तूर, कापूस इत्यादी सर्व पिकामधील दिलेल्या पूर्वसुचनांचे 30 टक्के सॅम्पल सर्वे करुन झालेल्या नुकसानीच्या व क्षेत्राच्या प्रमाणात मदत देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.
या सर्वेक्षणासाठी क्षेत्रीय स्तरावर संबंधित कृषि सहाय्यक, विमा प्रतिनिधी व शेतकरी यांची उपसमिती नेमली असून त्यांच्या कामाचे सनियंत्रण संबंधित मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व तालुकास्तरीय विमा प्रतिनिधी यांनी करावेत, असे आदेशही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिले आहेत.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment