09 September, 2024

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन त्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करा - मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील

हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन त्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश राज्याचे मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी वसमत येथे आयोजित आढावा बैठकीत दिले. वसमत येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत अतिवृष्टीने बाधित झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. यावेळी आमदार राजू नवघरे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपविभागीय अधिकारी विकास माने आदी उपस्थित होते. अतिवृष्टीने झालेले नुकसानीची आज प्रत्यक्ष पाहणी केली असता पीक परिस्थिती, खरडून गेलेल्या जमिनी, झालेल्या पिकाचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करुन देण्यासाठी त्याचे प्रस्ताव पाठवावेत. निधीसाठी राज्याच्या वित्त विभागाकडून मागणी करुन घेता येईल. सौम्यीकरणाचे प्रस्ताव ढोबळ मानाने पाठवले आहेत. तांत्रिक मान्यतेसाठी हे सर्व प्रस्ताव सविस्तर स्वरुपात पाठवावेत, त्यास तात्काळ मान्यता देण्यात येईल. तसेच महावितरण विभागाने वीज वाहिन्यांचे क्षतिग्रस्त खांब, रोहित्र, पिण्याचे पाणी, शेतीपंपाच्या अडचणी सोडवून वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत. पावसाच्या पाण्यामुळे साथरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य व्यवस्था, औषधी साठा, लसीकरण, स्वच्छता यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. कुरुंदा येथील आसना नदी पात्र खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाच्या प्रस्तावास मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंधारण विभागाकडून तातडीने तांत्रिक मान्यता देण्यात येईल. तसेच हे काम तितक्याच तात्काळ सुरु करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. पुराच्या पाण्यात वाहून गेलेले पशुधन, त्यांचे शव विच्छेदन होत नसल्यामुळे पशुगणनेनुसार पंचनामे करून त्यांच्या नोंदी घेण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी यंत्रणेला दिले आहेत. भविष्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी रोबोटच्या मदतीचा प्रयोग करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात स्वतंत्र आपत्ती नियंत्रण कक्षासाठी दोन हजार स्क्वेअर फुट जागा उपलब्धतेचा प्रस्ताव पाठवावा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्षासोबत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष यांचा योग्य समन्वय राखण्यासाठी आधुनिक पद्धतीची संदेश यंत्रणा आणि स्टोअर रुमची व्यवस्था करण्यात येणार आहे. मागील वर्षी पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची अडचण केली आहे. यंदा कंपनी बदलली आहे. पीक विमा कंपनीमार्फत 25 टक्के अग्रीम रक्कम वितरीत करण्यात येईल. मदत व पुनवर्सन विभागामार्फत जानेवारी, 2023 ते जानेवारी, 2024 पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील 176 कोटी रुपये दिले आहेत. तसेच नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे 195 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. केवायसीमुळे ज्यांना मदत मिळाली नाही त्यांनी तातडीने केवायसी करुन घ्यावेत, असे आवाहनही श्री. पाटील यांनी यावेळी केले. पाझर तलाव, करपरा नदीवरील उखळी येथील बंधाराबाबतही निर्णय घेण्याची माहिती आमदार श्री. नवघरे यांनी दिली असता, मंत्र्यांनी त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल़्या. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मंत्र्यांना जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेले नुकसान आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याची माहिती देताना जिल्ह्यात 2 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून आतापर्यंत 70 टक्के पंचनामे पूर्ण केले आहेत. तसेच सिंचन प्रकल्प, त्यातील जलसाठ्यातील उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्याची स्थिती, पुरात वाहून गेलेले आणि मृत व्यक्ती, बाधित घरे, वाहून गेलेले पशुधन, पडझडीची माहिती त्यांनी दिली. पुराच्या पाण्यामुळे 218 नागरिकांना स्थलांतरीत केले. पुराच्या पाण्यात झाडांवर व इतर ठिकाणी अडकलेल्या नागरिकांनाही सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात गुरे, गोठे वाहून गेले तर,29 रस्ते आणि 40 पुलांचे अप्रोच रोड नादुरुस्त झाले आहेत. सध्या तात्पुरत्या स्थितीत ते सुरु करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे रस्ते पाण्यामुळे क्षतिग्रस्त झाले आहेत. त्यांच्या कायमस्वरुपी दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सादरीकरणाद्वारे दिली. तसेच यावेळी महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कृषि विभागाच्या अधिका-यांनी सादरीकरण केले. यावेळी पुरात वाहून गेलेल्या पाच पशुपालक शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मंत्र्यांच्या हस्ते नुकसान भरपाई धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच हिंगोली नगर परिषदेच्या वतीने शहरात झालेल्या पुरपरिस्थतीत उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. *******

No comments: