18 September, 2024

दिव्यांगमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 18 : लहान मुलांमध्ये असलेल्या दिव्यंगत्वाचा शोध घेऊन त्याच्यावर वेळेत उपचार केल्यास 90 टक्के मुले यातून दुरुस्त होऊ शकतात. याचे योग्य नियोजन केल्यास आगामी काळात आपला जिल्हा दिव्यांगमुक्त होण्यास मदत होणार आहे. यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत देशातील 75 आकांक्षित जिल्ह्यात एडिप योजनेतून दिव्यांगाना विविध साहित्याचे मोफत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र ठाकूर यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्वांना ऑनालाईन मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, भारतीय कृति अंग निर्माण निगम (एलिम्को) कानपूरचे किरण पावरा, अस्थिरोग तज्ञ डॉ. मनीष बगडीया, मधुकर राऊत, लक्ष्मण मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. गोयल म्हणाले, अपंग अधिनियमान्वये 21 प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. अपंगत्वाचे प्रामुख्याने दोन भागात वर्गीकरण करावे. यामध्ये पहिल्या भागात ओळखलेले किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या दिव्यांगाना उपकरण उपलब्ध करुन देऊन सक्षम करणे तर दुसऱ्या भागामध्ये दिव्यांगमुक्त जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी शोध मोहिम राबविण्याची गरज आहे. यासाठी ग्रामपातळीवरील सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व आरोग्य केंद्र तसेच विविध स्वयंसेवी संघटना यांनीही जिल्हा प्रशासनास दिव्यांगमुक्त हिंगोली जिल्हा करण्यास मदत करावी. शासनाने दिव्यांगासाठी 5 टक्के निधी राखून ठेवला आहे. तसेच त्यांना विशिष्ट ओळख म्हणून युडीआयडी कार्डाचेही वितरण करण्यात आले आहे, त्यामुळे या क्षेत्रात सर्वांनी पुढे येऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी केले. यावेळी प्रास्ताविकात जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी जिल्ह्यात 1069 दिव्यांगांना विविध उपकरण साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींवर विविध उपचार, तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी वंचित दिव्यांगांना याबाबत आपण सर्वांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रमुख मान्यवराच्या हस्ते हिंगोली तालुक्यातील 111 दिव्यांगांना तीन चाकी, सायकल, बॅटरी ऑपरेटेड सायकल, कानाची मशीन, अंधाची सेंसर काठी, कुबडी, व्हीलचेअर, कृत्रिम अवयव, चष्मे इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील लाभार्थ्यांना पुढील कालावधीत तालुकास्तरावर साहित्य वाटप शिबीरे घेण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. या कार्यक्रमास दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

No comments: