30 September, 2024

जिल्हा हिवताप कार्यालयाकडून २६ गावात धूर फवारणी, साथरोग उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. ३० : हिंगोली जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सतत पाऊस पडत आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावामध्ये जलजन्य व कीटकजन्य आजाराची साथ पसरू नये. यासाठी दैनंदिन सर्वेक्षण करून वेळीच खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. डास आळी सर्वेक्षण करून डास आळी आढळून आलेल्या कंटेनरमध्ये डास आळी नाशक औषधे टाकून भांडी रिकामी करावीत. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. डेंग्यू, मलेरिया चिकनगुनिया या आजाराबाबत आरोग्य शिक्षण देत जनजागृती करावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. किटकजन्य आजार डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया या आजाराचे तसेच तापाचे रुग्ण वाढू नयेत, यासाठी जिल्ह्यामध्ये गावपातळीवर आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण करून अबेटीग करण्यात येत आहे. जलद ताप सर्वेक्षण करून तापीच्या रुग्णांचे एकूण 205 रक्तजल नमुने तपासासाठी घेण्यात आले. तसेच धूर फवारणी जिल्हा हिवताप कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयामार्फत जिल्ह्यात करण्यात येत आहे. या महिन्यात आतापर्यंत एकूण 26 गावात धूर फवारणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे. *******

No comments: