06 September, 2024
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडून आढावा
हिंगोली, दि.06 (जिमाका) :अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, जनावरे, घरांचे झालेले नुकसान व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसानीचे पथक स्थापन करून तात्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना सर्व संबंधिताना दिल्या.
या बैठकीत शेत जमिनीचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली यांना सर्व तालुक्यातील बाधित नागरिकांना धान्य पुरविण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसानीचे अहवाल सादर करण्यासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद हिंगोली, पशुसंवर्धन विभाग, नगर परिषद, नगर पंचायत व महावितरण विभाग, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नांदेड व अमरावती, आरोग्य विभाग यांना सुचित करण्यात आले.
दि. 01 व 02 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व पावसामुळे बाधित झालेल्या गावांची संख्या 684 असून जखमी व्यक्तींची संख्या 01 आहे. मयत व्यक्तीची संख्या 02 असून दोन्ही व्यक्तीच्या वारसास मदत वितरीत करण्यात आली आहे. अंशतः पडझडीमुळे नुकसान झालेल्या घरांची संख्या प्राथमिक अहवालानुसार 955 एवढी आहे. तसेच शेतीपिक नुकसानीचे बाधित क्षेत्राचे सविस्तर पंचनामे करण्याची कार्यवाही सर्व तालुक्यांच्या ठिकाणी प्रगतीपथावर असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment