03 September, 2024

अतिवृष्टी बाधित भागांचे पंचनामे करताना अचूकता ठेवा - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

• बाधित गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधा सुरळीत करण्याला प्राधान्य द्या • सर्व विभागप्रमुखांनी सतर्क राहावे हिंगोली(जिमाका),दि.03: जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित भागांचे पंचनामे करताना योग्य समन्वय राखून अचूक माहिती भरावी. तसेच जिल्ह्यातील पशुधन, शेती, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तसेच रस्ते आणि पुलांसह वीज, पिण्याचे पाणीपुरवठा आदी मूलभूत सोयीसुविधा पुढील दोन दिवसांत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत. जलसंधारण, जलसंपदा विभागानेही त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या गाव तलाव आणि पाझर तलावांची दुरुस्ती करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे संबंधित विभाग प्रमुखांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातून आज ते दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव आदी उपस्थित होते. जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे, शेती, पशुधन आणि वीज पुरवठा तसेच रस्ते, पुलांचे आणि सार्वजनिक मालमत्ताचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करताना एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये, याची खबरदारी घ्यावी. हे पंचनामे तात्काळ सुरु केल्यास माहितीमध्ये अचूकता येईल. त्यामुळे संबंधित विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके नेमून या कामाला प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यास प्राधान्य द्यावे. ज्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या आणि त्यासाठी लागणारा वीजपुरवठा पूर्ववत करण्यापूर्वी त्यांच्या गावनिहाय याद्या तयार कराव्यात. त्यामुळे त्या गावांना पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा सुरळीत करणे सोईचे होईल, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच पावसामुळे नदीवरील रस्ते आणि पुल क्षतीग्रस्त झाले असून, एनएचएआयचे रस्ते आणि पुलांची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी केल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांचेही काम तातडीने पूर्ववत करून घेण्याचे निर्देश दिले आहे. सावरखेडा येथील रस्ता पुलाचा एक भाग पूर्ण तुटला आहे. तसेच सोडेगाव येथील कयाधू नदीवरील रस्ता आणि पुलाचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिले. रस्ते आणि पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ववत करताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तहसीलदार, गावचे सरपंच किंवा पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना कामाबाबत माहिती द्यावी. त्यामुळे नागरिक आणि प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय राहील, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी, दुभती जनावरे यांचे झालेले नुकसान आणि पुराच्या पाण्यात वाहून गेलेले पशुधन यांचे पंचनामे तात्काळ करून घ्या. पाणी ओसरल्यानंतर मलेरिया आणि साथीचे रोग पसरणार नाहीत, यासाठी रोगप्रतिबंधक फवारणी, लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमधील उपकरणांचे झालेले नुकसान याची तात्काळ माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.गोयल यांनी दिले. क्लोरीन टॅबलेट आणि ब्लिचिंग पावडरचा गावपातळीवर पुरवठा करावा. जेणेकरून नागरिकांना आरोग्यविषयक समस्या उद्भवणार नाहीत. गावपातळीवर नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाने दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच पावसामुळे गावातील शाळांची, वर्गखोल्यांची धोकादायक स्थितीत आहेत का याबाबत शिक्षण विभागाकडून माहिती जाणून घेतली. तसेच धोकादायक स्थितीत शाळा असल्यास सुरक्षित ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या. *****

No comments: