18 September, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत खाजगी आस्थापनांमध्ये नियुक्तीसाठी रोजगार मेळावा

हिंगोली (जिमाका), दि. 18 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी खासगी आस्थापनांमध्ये त्यांना शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्यासाठी नियुक्ती मिळणार आहे. त्यासाठी दि. 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात 2 रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील खाजगी आस्थापना व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आयोजित रोजगार मेळाव्यात इच्छूक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होणार आहे. तसेच उद्योजकांना त्यांच्या कामासाठी लागणारे मनुष्यबळ या योजनेद्वारे 6 महिने कालावधीसाठी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यातील खाजगी (उद्योग, कंपनी, कृषी उद्योग, गोदाफार्म, व्यवसाय, खाजगी अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, विद्यालय, महाविद्यालय) या आस्थापनांमध्ये हे प्रशिक्षणार्थी काम करू शकणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. दि. 20 सप्टेंबर, 2024 रोजी वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, नर्सी नामदेव ता. हिंगोली व वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, गोरेगाव ता. सेनगाव येथे रोजगार मेळावा होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे 24 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमत, येथे 25 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेनगाव येथे होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळमनुरी व वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, आखाडा बाळापूर ता. कळमनुरी, येथे 30 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंढा नागनाथ व वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे होणार आहे. दि. 1 ऑक्टोबर, 2024 रोजी वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, कुरुंदा ता. वसमत येथे रोजगार मेळाव्याचे अयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांसाठी पात्रता : उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. महाराष्ट्राचा अधिवासी असावा. आधार नोंदणी, बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अद्ययावत नोंदणी केलेली असावी. बँक खात्याविषयीची कागदपत्रे अपलोड करावीत. या कार्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हता प्रमाणे 12 वी पास शैक्षणिक अर्हतेसाठी 6 हजार, आयटीआय व पदविका शैक्षणिक अर्हता असलेल्यांना 8 हजार आणि पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता असलेल्यांना 10 हजार याप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील 12 वी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर या शैक्षणिक अर्हतेनुसार सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in येथे नोंदणी करावी. आपले आधार कार्डशी संलग्न बँक खात्यावरील माहिती भरुन कागदपत्रे अपलोड करावीत व सदरील आस्थापनेस ऑनलाईन अर्ज करावा. तसेच आपल्याकडील कागदपत्रे सोबत घेऊन जवळच्या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखतीस उपस्थित रहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनीवर किंवा 99767213394, 7972888970, 7385924589 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. कोल्हे यांनी केले आहे. *******

No comments: