10 September, 2025

नेपाळमध्ये अडकलेल्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी

हिंगोली, दि.१० (जिमाका): नेपाळ येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील नागरिक पर्यटन किंवा इतर कारणांमुळे तिथे अडचणीत सापडलेल्या त्यांच्या परिवाराने किंवा पालकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील 9405408939 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नेपाळ येथे स्थानिक कारणांमुळे हिंसाचार उफाळला आहे. भारतातून तसेच मुख्यतः महाराष्ट्रातून नेपाळमध्ये पर्यटन तसेच इतर कारणाने जे नागरीक गेले आहेत त्यांना देखील हिंसाचाराचा फटका बसला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदरील क्रमांक जारी करण्यात आला असल्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. ****

राखीव निकालाबाबत उमेदवारांनी 15 सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर माहिती भरावी * शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा

हिंगोली (जिमाका), दि. 10 : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27 ते 30 मे आणि 2 ते 5 जून, 2025 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये 60 परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 8 दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते. या परीक्षेस 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवार परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेचा निकाल दि. 18 ऑगस्ट, 2025 रोजी गुणयादी व गुणपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण 6 हजार 320 प्रविष्ठ विद्यार्थी, उमेदवारांपैकी 2 हजार 789 विद्यार्थी उमेदवारांचा निकाल दि. 25 ऑगस्ट, 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तद्नंतर दि. 3 जून, 2025 रोजी 244 विद्यार्थी उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे 6 हजार 320 प्रविष्ठ विद्यार्थी, उमेदवारांपैकी 3 हजार 187 प्रविष्ठ विद्यार्थी उमेदवारांनी 2 मे 2025 अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिलेल्या संकेतस्थळावरील लिंकद्वारे अद्यापही माहिती न भरल्याने अशा 3 हजार 187 विद्यार्थी उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमध्ये माहिती व अंतिम वर्षास प्रविष्ट उत्तीर्ण असल्याबाबतचा निकाल दि. 15 सप्टेंबर, 2025 पर्यंत देण्यात यावा. यानंतर माहिती सादर करणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही. याची सर्व विद्यार्थी उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे. *****

राष्ट्रीय लोकन्यायालयाचे शनिवारी आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, (दि.13) रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये बँक, ग्रामपंचायत, नगर परिषद, एमएसईबी व फायनान्स यांचे वाद दाखलपूर्व प्रकरणे हे तडजोडीच्या आधारे निकाली काढण्यात येणार आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये सर्व विधिज्ञांनी जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून तडजोड करुन निकाली काढावीत, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले आहे. *****

एकरकमी कर्जफेड करणारांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत

हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची सुधारित एकरकमी योजना दि. 31 मार्च, 2026 पर्यंत लागू करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली-413513 (दूरध्वनी क्र. 02456-224442) येथे संपर्क साधावा. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे. *****

09 September, 2025

हिंगोलीत संचालकांची एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 09 : जागतिक बँक अर्थसहायित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत टीएसए (प्लॅडियम) संस्थेमार्फत समुदाय आधारित संस्थेच्या संचालकांची जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा आज येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या आत्मा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ॲक्सेस टू फायनान्स प्रोक्रूमेंट असोसिएट आरआययूचे हनुमंत आरदवाड, ॲग्री बिझनेस असोसिएट आरआययूचे मंगेश लांबाडे, फूड सेफ्टी ॲन्ड क्वालिटी असोसिएट आरआययूचे सचिन कच्छवे, जिल्हा समन्वयक वैभव तांबडे, यांच्या सर्व टीमने समुदाय आधारित संस्थेच्या संचालकांना विविध विषयांवर प्रात्यक्षिकपणे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक जी. बी. बंटेवाड यांनी केले. या कार्यशाळेस जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी जी.बी. बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ जी. एच. कच्छवे व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, कंपनीचे संचालक उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन वैभव तांबडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जी. एच. कच्छवे यांनी केले. ******

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी • १६,७९८ नागरिकांनी केले रक्तदान

मुंबई, दि. ९ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान १२,६५५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून ७ लाख ४०७३ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या १८,८०० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेच, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून २३६ शिबिरांतून एकूण १६,७९८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानात : एकूण आरोग्य शिबिरे : १२,६५५ एकूण लाभार्थी रुग्ण : ७,०४,०७३ एकूण पुरुष लाभार्थी : ३,१३,५०८ एकूण महिला लाभार्थी : ३,०५,०३४ लहान बालक लाभार्थी : ८५,५०८ संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : १८,८०० एकूण रक्तदान शिबिरे : २३६, एकूण रक्तदाते : १६,७९८ महाराष्ट्रातील ७.०४ लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर १६,७९८ दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी योगदान दिले आहे. जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान सर्वाधिक शिबिरे : पुणे – २५२५ सर्वाधिक रुग्ण तपासणी : पुणे – १,६५,७१८ सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे – ३,६१३ सर्वाधिक रक्तसंकलन : कोल्हापूर – ४,५०४ बालकांचा सर्वाधिक सहभाग : पुणे – २०,७८१ गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करता आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या १८,८०० रुग्णांना पुढील मोफत उपचार दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. 0000

निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर अपलोड करुन तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे रमेश भडके यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. विविध विकास योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर न करणाऱ्या कार्यालय प्रमुखावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, परिवहन विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. आकांक्षीत तालुकाअंतर्गत सर्व कामाची माहिती पोर्टलवर अपडेट करावी निती आयोगाच्या निर्देशांकानुसार आकांक्षीत तालुका हिंगोलीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार सर्व यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावेत. केलेल्या कामाची माहिती पोर्टलवर वेळोवेळी अपडेट करावी. तसेच जिल्हा वार्षिक योजनेत ज्या बाबीसाठी निधी नाही ती कामे आकांक्षीत उपक्रमांतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. *******