17 January, 2026

हिंद-दी-चादर'निमित्त नांदेड येथील मुख्य कार्यक्रमासाठी जनजागृती दौरा



हिंगोली, दि.१७ (जिमाका) : श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 'हिंद-दी-चादर' या राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज तसेच राज्यस्तरीय समन्वय समितीचे अशासकीय सदस्य ॲड. संतोष राठोड, यांचा जनजागृती दौरा आज शनिवारी पेडगाव तांडा व तिखाडी तांडा येथे आयोजित करण्यात आला होता.

या जनजागृती दौर्‍याच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धार्मिक स्वातंत्र्य, मानवता, समता व बलिदानासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच 'हिंद-दी-चादर' कार्यक्रमाच्या उद्दिष्टांबाबत जनजागृती करून नांदेड येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

महंत सुनील जी महाराज यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचा बलिदानाचा इतिहास, त्यागाची परंपरा व समाजात त्यांनी दिलेला धार्मिक सहिष्णुतेचा संदेश यावर त्यांनी प्रकाश टाकला. विविध धर्म, पंथ व समाजघटकांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा असल्याचे महंत सुनील महाराज यांनी सांगितले.

ॲड. संतोष राठोड यांनी राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने 'हिंद-दी-चादर' कार्यक्रमाची पार्श्वभूमी, नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाची रुपरेषा तसेच नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व याबाबत माहिती दिली. समाजातील सर्व घटकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊन श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या स्मृतीस अभिवादन करावे, असे त्यांनी आवाहन केले.

याप्रसंगी स्थानिक नागरिक, विविध समाजाचे प्रतिनिधी, युवक, महिला तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौर्‍यामुळे पेडगाव तांडा व तिखाडी तांडा परिसरात “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाबाबत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

*****

No comments: