हिंगोली, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त सहकार्याने आणि ‘हिंद-दी-चादर’ शहीदी शताब्दी समागम राज्यस्तरीय समिती यांच्या वतीने महान धर्मरक्षक, त्याग व बलिदानाचे प्रतीक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी शताब्दी निमित्त भव्य राज्यस्तरीय समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समागम दि. 24 व 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत मोदी मैदान, वाघाळा, नांदेड येथे संपन्न होणार आहे. या भव्य आणि ऐतिहासिक समागम सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
‘तिलक जंझू राखा प्रभ ताका… सीस दिया पर सिररू न दिया…’ या अमर वचनांनी धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शौर्यगाथेचे स्मरण या समागमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. धर्मस्वातंत्र्य, मानवता, सहिष्णुता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या समागमाचा मुख्य उद्देश आहे.
या दोन दिवसीय समागमाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, पंच प्यारे, नामवंत संत-महंत, विविध धर्मगुरू, प्रचारक, कीर्तनकार यांचे प्रवचन, कीर्तन, विचारमंथन तसेच सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंच प्यारे म्हणून सिंघ साहेब भाई कुलवंत सिंघजी (जथेदार साहेब), भाई जोतिंदर सिंघजी (मीत जथेदार), भाई कश्मीर सिंघजी (हेड ग्रंथी), भाई गुरमीत सिंघजी (मीत ग्रंथी) व भाई राम सिंघजी धुपीया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच संत ज्ञानी हरनाम सिंघजी (दमदमी टकसाल), धर्मगुरु डॉ. बाबु सिंघजी महाराज पोहरादेवी, रघु मुनीजी, संत बाबा बलविंदर सिंघजी (कार सेवावाले), बागेश्वर धामचे पं. धीरेन्द्र कृष्ण शास्त्री महाराज, ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांच्यासह देश-विदेशातील अनेक नामवंत प्रचारक व वक्ते या समागमास उपस्थित राहणार आहेत.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांची शहीदी ही केवळ शीख समाजापुरती मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि सत्यासाठी होती. याच भावनेतून सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन तसेच भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय हे सर्व समाज एकत्र येऊन हा शहीदी समागम आयोजित करीत आहेत. या सर्व समाजांचे गुरु साहिबांशी ऐतिहासिक व आध्यात्मिक संबंध असून, त्यांनी शतकानुशतके एकता, धैर्य आणि मानवतेचा संदेश दिला आहे. हा समागम केवळ श्रद्धांजली नसून गुरु साहिबांच्या शिकवणी, त्याग व हौतात्म्याची भावना भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा व्यापक प्रयत्न आहे. या कार्यक्रमाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी धार्मिक रथाद्वारे तांडे, गावे, शहरे, तालुका व जिल्हा स्तरावर प्रचाररथांच्या माध्यमातून प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.
हा समागम समस्त शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन तसेच भगत नामदेव वारकरी संप्रदाय समाज यांच्या संयुक्त सहभागातून संपन्न होणार असून, सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक व प्रेरणादायी शहीदी शताब्दी समागमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शहीदी समागमाच्या अधिक माहितीसाठी www.gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment