20 January, 2026

जिल्हास्तरीय कुष्ठरोग समन्वय समितीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा


• स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश


हिंगोली, दि. २० (जिमाका) :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या “स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान” अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज घेतला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कुष्ठरोग समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. 


या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश मीना, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. शैलेजा कुपास्वामी, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे, डॉ. सचिन राठोड, डॉ. तृप्ती पाटील आदी उपस्थित होते.


 गावपातळीवर शाळांमध्ये कुष्ठरोगाबाबत रांगोळी, चित्रकला, निबंध लेखन अशा स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करावी. तसेच २६ जानेवारी २०२६ रोजी सर्व गावांतील ग्रामसभांमध्ये कुष्ठरोगाविषयी माहिती देऊन कुष्ठरोग घोषणापत्र व प्रतिज्ञेचे वाचन करून घ्यावे. यासोबतच ३० जानेवारी २०२६ रोजी सर्व शासकीय कार्यालये व शाळांमध्ये कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा वाचन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. 


या बैठकीत येत्या ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावर्षी कुष्ठरोग जनजागृतीसाठी “कुष्ठरोगाबाबत भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया” असे यावर्षीचे घोषवाक्य आहे.

 जिल्ह्यात डिसेंबर २०२५ अखेर १६४ नवीन कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यात आला असल्याचे सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते यांनी प्रास्ताविकात सांगितले. या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान हे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व ग्रामपंचायत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, गावस्तरावर विविध उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


*****






No comments: