17 January, 2026

हिंद की चादर” कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन


हिंगोली(जिमाका), दि.१७ : श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या “हिंद की चादर” या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासकीय निर्णयानुसार तसेच विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे दि. १६ जानेवारी २०२६ रोजीचे पत्र व निवासी उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, हिंगोली यांच्या निर्देशानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आढावा बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी यासंदर्भात बैठक घेऊन करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठविले असून, त्या पत्रासोबत देण्यात आलेल्या लिंकवर संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत अद्यावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या अनुषंगाने सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी होणाऱ्या आढावा बैठकीत “हिंद की चादर” कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात विभागनिहाय व यंत्रणानिहाय करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीस तहसिलदार, आयुक्त नगरपालिका प्रशासन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक), जिल्हा परिषद, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा माहिती अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच सर्व अशासकीय सदस्य, विविध संप्रदाय व समाजाचे प्रमुख, अध्यक्ष, विविध उद्योग संस्था व उद्योजक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आढावा बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय, प्रचार-प्रसार, सुरक्षितता, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्थापन तसेच इतर पूरक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक दिशा-निर्देश देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती अनिता लव्हारे यांनी प्रसिद्धीपत्रकारव्दारे दिली आहे.
******

No comments: