15 August, 2018




युवा माहिती दूतांनी शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी
                                                                                          - पालकमंत्री दिलीप कांबळे

         हिंगोली,दि.15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत राज्यात ‘युवा माहिती दूत’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या ‘युवा माहिती दूत’ उपक्रमात सहभागी होवून शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहचावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री. कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे श्री. कांबळे म्हणाले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना ग्रामीण वा दूर्गम भागातील अशिक्षित व अर्धशिक्षित लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती पोहचविण्यासाठी, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे हा एक प्रभावी मार्ग आहे. याकरीता महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत संपूर्ण राज्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत राज्यातील 6 हजारपेक्षा जास्त महाविद्यालयात सुमारे 23 लाख पेक्षा जास्त शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमार्फत शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे सांगून यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी ‘युवा माहिती दूत’ उपक्रमांच्या बोधचिन्हाचे अनावरण करुन शुभारंभ केला.
            जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 51 टक्के पाऊस झाला. परंतू मागील काही दिवसापासून पावसाने ओढ घेतल्याने जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सन 2018-19 खरीप हंगामात जिल्ह्यात 3 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून. बियाणे आणि खतांची उपलब्धता करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 2 लाख 64 हजार शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झाल्याने ते संरक्षीत झाले आहे. तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील 66 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना रु. 267 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत सन 2016 ते 2019 कालावधीत जिल्ह्यातील 409 गावांची निवड झाली असून, जलयुक्त मुळे 31 हजार टि.सी.एम. हून अधिक पाणीसाठा निर्माण झाल्याने 62 हजार हेक्टर हून अधिक संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच माननीय राज्यपाल महोदयांनी हिंगोली जिल्ह्याचा सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचन अनुशेष जाहिर केला असून, त्या अनुशेष अंतर्गत जिल्ह्यातील 5 सिंचन योजनांचा समावेश आहे. त्यापैकी नवलगव्हाण साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगुन यावर्षी त्यात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 490 हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ झाली असल्याचे श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            ʿमागेल त्याला शेततळेʾ योजने अंतर्गत अडीच हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करुन उद्दिष्टपूर्ती झाली आहे. तसेच 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रम अंतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, जिल्ह्यात 59 लाख म्हणजे 195 टक्के वृक्ष लागवड करुन उद्दिष्टपुर्ती झाली आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे जिल्ह्याने चांगले काम केले असून, सन-2017 मध्ये जिल्ह्याने 134 टक्के ध्वजदिन निधी संकलीत केला असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
            राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व नगर पालिका आणि नगर पंचायती हागणदारी मुक्त घोषित केल्या असून, या माहिन्यात ‘स्वच्छ ऑगस्ट क्रांती’ मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगून वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत हिंगोली नगर परिषदेस शासनाकडून नगर परिषद प्रशासन इमारत, हिंदू स्मशान भूमी विकसीत करणे, शिवाजीराव देशमुख सभागृह आणि नाट्यगृह या कामासाठी 24 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर विशेष रस्ता योजने अंतर्गत वसमत नगर
परिषदेस 2 कोटी आणि कळमनुरी नगर परिषदेस 1 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच सेनगाव नगर पंचायतीस मुख्य रस्त्यासाठी 5 कोटी तर औंढा नगर पंचायतीस विविध विकास कामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती ही श्री. कांबळे यांनी यावेळी दिली.
            संपूर्ण राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने श्री. कांबळे यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देवून जनजागृती करण्याचे आवाहन केले.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणारा सन 2016 चा प्रथम पुरस्कार मे. गुरूकृपा इंडस्ट्रिजचे उद्योजक श्री. अमित ओमप्रकाश हेडा यांना देण्यात आला. तर व्दितीय पुरस्कार मे. श्री. बालाजी इंडस्ट्रिजचे उद्योजक श्री. जनकराज ब्रीजलाल खुराणा आणि मे. ओंकार फॅब्रीक्स प्रा. लि. चे उद्योजक श्री. संतोष भगवानदास झंवर यांना विभागून देण्यात आला. तसेच शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या पुर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात मेरीट मध्ये आलेली विद्यार्थी कु. प्रेरणा विलास मोरे आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता 10 वी मधून राज्यातुन एस.टी. प्रवर्गातील प्रथम पारितोषिक कु. मंजिरी मनोज गुरुनवाड यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
            पालकमंत्री श्री. कांबळे यांनी यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह मान्यवरांच्या भेटी घेवून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ स्टॉलला भेट देवून अंकाची खरेदी ही केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी पालकमंत्री श्री. कांबळे यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित ‘महामानव’ हा ग्रंथ भेट स्वरुपात दिला.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हा  निवडणूक अधिकारी  गोविंदरणवीरकर,  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ आणि गणेश वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, सहायक संचालक रेणुका तम्मलवार, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे  यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

****



No comments: