01 August, 2018

समाज माध्यमावरील माहितीची सत्यता पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती टाकू नये पोलिस अधिक्षक योगेश कुमार



 समाज माध्यमावरील माहितीची सत्यता पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती टाकू नये
                                                                                                पोलिस अधिक्षक योगेश कुमार

        हिंगोली, दि.01: फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टिटर, व्हॉट्स अॅप आदी समाज माध्यमे आज नागरिकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनली आहेत. समाजमाध्यमातून आलेल्या माहितीची सत्यता पडताळणी न करताच पुढे (फॉरवर्ड) पाठविली जाते. परंतू अशा अफवा पसरविणाऱ्या माहितीमुळे समाजातील वातावरण बिघडून त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याकरीता नागरिकांनी समाज माध्यमांवरील माहिती पुढे पाठवितांना (फॉरवर्ड) माहितीची सत्यता पडताळूनच पाठवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी केले.
            जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलिस अधिक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधिक्षक कार्यालय येथील नागनाथ सभागृहात माध्यम प्रतिनीधीसाठी ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ या विषयावरील कार्यशाळेत श्री. योगेश कुमार हे बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार तोष्णीवाल, पोलिस उपविभागीय अधिकारी (गृह) सुजाता पाटील, पोलिस निरिक्षक (स्था. गु.शा.)  जगदीश भंडारवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. योगेश कुमार म्हणाले की, मागील काही दिवसात काही समाजकंटकांमार्फत व्हॉट्स अॅप, व्टिटर, फेसबुक, आदी समाज माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या निरर्थक आणि खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा खोट्या अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून निष्पाप नागरिकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले असून, अशा खोट्या अफवांमुळे आतापर्यंत 13 घटनांत 27 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातून अशा जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. अशा अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
            प्रगत तंत्रज्ञानामुळे आज सहज उपलब्ध असणाऱ्या समाज माध्यमांद्वारे काही क्षणात अफवा पसरविता येतात. आजच्या गतीमान काळात नागरिक माहितीची सत्यता पडताळणी न करता किंवा होणाऱ्या परिणामाचा विचार न करता माहिती पुढे पाठवतात. यामुळे समाजातील महापुरुष, जाती, धर्म, ग्रंथ शासनाविरुद्धच्या खोटी माहिती किंवा पोस्टची सत्यता पडताळून न पाहता फॉरवर्ड करणे संबंधीतास घातक ठरु शकते. समाज माध्यमांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे माहितीची सत्यता पडताळणी होत नाही. तसेच एखाद्या पोस्टबद्दल तक्रार करण्याची सुविधा व्हॉट्सॲप या माध्यमावर नाही. खोट्या अफवा पसरण्यापासून रोखणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे तरुणांनी कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी ती घटना, पोस्ट खरी आहे का याची खात्री करावी.तसेच आवश्यकता पडल्यास त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. समाज माध्यमांसंबधीत कायदा अत्यंत कठोर असून, यात दोषी आढळल्यास संबंधीतावर कडक शिक्षेची देखील तरतूद असल्याची माहिती दिली. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे ही पोलिस अधिक्षक योगेश कुमार यावेळी म्हणाले.
            यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ म्हणाले की, समाज माध्यमांचा वापर हा चांगल्या कामाकरीता होणे आवश्यक आहे. परंतू काही समाज विघातक लोक याचा दूरुपयोग करुन समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करतात. हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे एस. टी. महामंडळाचे वाहक आणि वाहनचालक कर्तव्यावर मुक्कामी गेले असता. गावकऱ्यांनी त्यांना मुले चोरणारे समजून मारहाण केली होती. सदर घटना बासंबा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असल्याने बासंबा येथील दोषी गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी उदाहरण दिले. त्यामुळे समाज माध्यमांवरील खोट्या अफवापासून सावध रहा.खोट्या अफवांची सत्यता पडताळणीकरीता https://www.google.com/ , https://www.altnews.in/ किंवा इतर संकेतस्थळाचा वापर करावा.
            समाज माध्यमावरील निरर्थक आणि खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मिडियातून आलेल्या मॅसेजवर विश्वास ठेवू नये. तसेच अशा प्रकारचे अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्ष, हिंगोली (दूरध्वनी क्र. 02456-220232, 7218626101) येथे संपर्क साधावा, असे आवाहन ही श्री. गुंजाळ यांनी यावेळी केले.
            प्रारंभी जिल्हा पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ, पोलिस निरिक्षक जगदीश भंडारवार यांचा महामानव हा ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला.
            यावेळी कार्यशाळेस प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रतिनीधींची उपस्थिती होती. कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले.
            तसेच सुत्रसंचलन पोलिस निरिक्षक (स्था.गु.शा.) जगदीश भंडारवार यांनी केले तर उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) सुजाता पाटील यांनी आभार मानले.
****

No comments: