31 July, 2018

डेंग्यू जागृती मोहीम पंधरवड्याचे आयेाजन


डेंग्यू जागृती मोहीम पंधरवड्याचे आयेाजन

हिंगोली,दि.31: जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने 01 ते 15 ऑगस्ट 2018 या कालावधीत शालेय डेंग्यू जागृती मोहीम पंधरवडा म्हणून राबविण्यात येणार आहे. डेंग्यू आजाराने डोके वर काढले असून यावर कोणताही ठोस असा उपाय नाही. त्यासाठी अत्यंत महत्वाचा उपाय म्हणजे डासोत्पती स्थानांवर प्रतिबंध घालणे. सदर मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. तसेच इयत्ता 5 वी ते 12 वी मधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी उत्साही असतात त्यामुळे शालेय मुलांमध्ये डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रणासंदर्भात डेंग्यू आजाराविषयी जागृती करण्याच्या सूचना केंद्र सरकार मार्फत दिल्या गेलेल्या आहेत.
या मोहिमेमध्ये शिक्षकांसाठी डेंग्यू या आजाराविषयी कार्यशाळा, प्रात्यक्षिक, प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, घरोघरी डासअळी शोध मोहीम, डासअळी आढळलेल्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी यांची भेट, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, रांगोळी स्पर्धा इत्यादी उपक्रम घेण्यात येणार आहेत. या मोहिमेअंतर्गत शाळेतील शाळाप्रमुख, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, मुख्याध्यापक यांना डेंग्यू प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाय योजनेबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. या मोहिमेच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना डासमुक्ती बाबतची सामुहिक प्रतिज्ञा दिली जाणार आहे. एक दिवस एक कार्यक्रम अशा प्रकारे शालेय डेंग्यू जागृती मोहिम राबविली जाणार आहे. सदर मोहिम ही 1 ते 15 ऑगस्ट 2018 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील संपूर्ण शाळा, महाविद्यालयामधील संपूर्ण विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात येणार असल्याबाबत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी कळविले आहे.
00000

No comments: