06 July, 2018

पावसाळ्यात उद्भवणारे आजार व त्यावरील उपाययोजना




पावसाळ्यात उद्भवणारे आजार व त्यावरील उपाययोजना
            पावसात भिजणे सर्वांना आवडते, या दिवसाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण बाहेर फिरायला किंवा सहलींचे नियोजन करतात. पण या ऋतूचा आनंद घेण्याच्या नादात अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हिंगोली जिल्हयात साथरोग पसरु नये म्हणून आरोग्य विभागाने पावसाळयापूर्वी उपाययोजना केली असून साथरोग नियंत्रण कृती नियोजन तयार करण्यात आले आहे. या कृती योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
            राज्यात जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होत असते आणि त्याप्रमाणे यावेळीही पावसाने हजेरी लावलेली आहे. पावसाळा सुरु झाला की, मोठ्या प्रमाणात जिवोत्पात्तीची पैदास होत असते. पावसाळयात जिकडे तिकडे पाणी मोठया प्रमाणात वाढत असते. गावातील, शहरातील नाल्या तुडूंब वाहतात. हे दुषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यास यापासून जलजन्य साथीचे रोग निर्माण होतात. पावसाचे वाहणारे पाणी आड, विहीर, हातपंप, विंधन विहिरींचे पाणी दुषित करते. हे दूषित पाणी जनतेच्या पिण्यात आल्यामुळे जलजन्य साथी उद्भवतात. त्यात ग्रॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, काविळ, विषमज्वर या साथींच्या रोगांचा समावेश अहे.
            या साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बाहेरील दूषित पाणी ज्या ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते, त्या ठिकाणी जाणार नाही यासाठी नळ योजनेतील नळ गळत्या, वॉल गळत्या दुरुस्त करणे, आड, विहीरीचे कठडे बांधून देणे, हातपंप, विंधन विहीर परिसर 50 फुटापर्यंत स्वच्छ ठेवणे, सांडपाणी वाहते ठेवणे, त्याचे कठडे फुटले असतील तर दुरुस्त करणे ही काळजी पावसाळयापुर्वी स्थानिक स्वराज्य संस्था मग ते नगरपालिका असो किंवा ग्रामपंचायतीने करणे आवश्यक असते. पाण्यामध्ये दररोज ब्लिचिंग पावडर टाकून शुध्दीकरण करावे तसेच हातपंप, विंधन विहीरींचे शुध्दीकरण दर सहा महिन्याला करणे आवश्यक आहे.
            याबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व पावसाळ्यातील आजारापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी आप-आपल्या परीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या दिवसात गुरांचे गोठे, शेणखताचे खड्डे येथे मॅलॅथिऑन पावडर टाकावी. घराच्या आजूबाजुच्या परिसरातील नाल्या, गटारात पाणी साचू न देणे, शिर्ष खड्याद्वारे पाण्याचा निचरा करणे, घर, परिसर तसेच गुरांचा गोठा स्वच्छ ठेवणे, घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, घरातील अडगळी, भिंतीच्या भेगा बुजविणे, शेणाचे खड्डे वस्तीपासून दुर ठेवणे, डास व किटकापासून बचाव करण्यासाठी झोपतांना मच्छरदाणीचा वापर करणे या प्रकारच्या दक्षता रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये  म्हणून घ्याव्यात.
            जलजन्य आजारात प्राधान्याने होणारे आजार म्हणजे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण या आजारांमध्ये शरीरातील पाणी जीवनावश्यक घटकातून मोठया प्रमाणात शरीराबाहेर उलटी व संडासद्वारे निघून गेल्यामुळे शरीरात तिव्र स्वरुपाची जलशुष्कता निर्माण होते व प्रसंगी मृत्यू देखील ओढावतो. त्यामुळे रोगाला वेळेवर ---2
-2-
उपचार करण्यासाठी दवाखान्यात न्यावे किंवा प्रथम ओ.आर.एस. पावडर सोल्यूशन अथवा जलसंजीवनीचा वापर मोठया प्रमाणात व आवश्यकतेनुसार करणे आवश्यक आहे. पावसाळयात कुठलेही पाणी पिणे, उघडयावरचे पदार्थ खाणे, सडकी फळे व शिळे अन्न खाणे हे जनतेने टाळले पाहिजे असा डॉक्टरांचा सल्ला आहे. तसेच शुध्दीकरण केलेलेच पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुले व एक वर्षाच्या आतील व वृध्द रुग्णांना उकळलेले पाणी पिण्यास देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.      
             जिल्ह्यात साथरोग पसरु नये म्हणून आरोग्य खात्याने पावसाळ्यापूर्वी उपाययोजना केली असून साथरोग नियंत्रण कृती नियोजन तयार करण्यात आले आहे. या कृती योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
            याबरोबरच जलजन्य रोग उद्भवू नये म्हणून सर्व ग्रामपंचायत व गाव स्तरावर ब्लीचींग पावडर उपलब्ध करण्यात आली असून नियमित पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांच्या कक्षात औषधीचा एपीडेमीक कीट तयार ठेवण्यात आले आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याच्या सक्त सूचना जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्या आहेत. पावसाळयात गावातील प्रत्येक उद्भवनाचे पाणी नमुने तपासण्यात येणार आहेत. अशा प्रकारची तपासणी इतर कालावधीतही गावातील उद्भवनाचे पाणी तपासण्यात येते. गावात अतिसार, हगवण, कॉलरा, गॅस्ट्रो या रुग्णांचे शौच नमुने तपासण्याचे व ग्रामपंचायतीतील ब्लिचिंग पावडर दर तीन महिन्यांनी तपासण्याची कार्यवाही अरोग्य विभागामार्फत  नियमीतपणे करण्यात येत आहे.
*****
अरुण सुर्यवंशी
जिल्हा माहिती अधिकारी
                                                                                      हिंगोली


No comments: