17 July, 2018

सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा अटल विश्वकर्मा सन्मान योजना


विशेष लेख क्र.04                                                                     दिनांक : 17 जुलै, 2018
सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा
अटल विश्वकर्मा सन्मान योजना
        सकाळी  7.30 वाजताची वेळ..  मोबाईलची बेल वाजली आणि अनुलोम संस्थेच्या कार्यकर्त्यांचा माझ्या मोबाईलवर कॉल आला. विषय होता अटल विश्वकर्मा सन्मान योजनेबाबत हिंगोली येथील  अतिमागास व कष्टाळू वडार समाजातील बांधवांना माहिती सांगून त्यांना या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यास प्रेरीत करण्याचा.... हा विषय ऐकल्यानंतर मी लगेच तयारीला लागले आणि सकाळी 9.00 वाजता गांधी चौकातील वडार वाड्यावर अनुलोम संस्थेच्या कार्यकर्त्यांसह पोहोचली. आणि या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेची माहिती या अतिमागास वडार समाजातील बांधवांना सांगण्यास सुरुवात केली...
        या योजने अंतर्गत बांधकाम कामगार यांचा समावेश होत असून त्यांचे वय 18 ते 60 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. या योजने अंतर्गत दिनांक 4 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत रत्नागिरी, सेालापूर, कोल्हापूर,अहमदनगर,धुळे,नंदूरबार,नांदेड,परभणी, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये  विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी 20 हजार कामगारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार कामगारांची नोंदणी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत झालेली आहे.
        या योजने अंतर्गत नोंदणी करणाऱ्या बांधकाम कामगारांना शासनाकडून मिळणारे लाभ-
शैक्षणिक सहाय्य योजना – नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यास 1ली ते 7वी साठी 75 टक्के हजेरी असल्यास प्रतिवर्षी रु. 2 हजार 500 रुपये, 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी रु.5 हजार,दोन पाल्यास 10 वी  आणि 12 वी मध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु.10 हजार एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक साहित्य,  तर 11 वी व 12 वी च्या  शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु.10 हजार एवढे शैक्षणिक सहाय्य,  तसेच त्यांच्या पाल्यास अथवा पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके इत्यादीसाठी प्रतिवर्षी 20 हजार रुपये  एवढे शैक्षणिक सहाय्य तसेच दोन पाल्यांसाठी  अथवा पत्नीस वैद्यकीय शिक्षणासाठी प्रतिवर्षी 1 लाख तर अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी  60 हजार रुपये, दोन पाल्यास शासनामान्य पदवी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 20 हजार व पदव्युत्तर शिक्षणासाठी  प्रतिवर्षी 25 हजार एवढे शैक्षणिक सहाय्य, आणि संगणकाचे शिक्षण (एमएससीआयटी) घेण्यासाठी प्रतिपूर्ती शुल्क दिले जाईल अथवा उत्तीर्ण असल्यास एमएससीआयटी प्रमाणपत्र सादर करुन शुल्क मिळविता येईल.

आरोग्य योजना –या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या आजाराच्या उपचारांसाठी वैद्यकीय लाभ, तसेच कामगारांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी रु.1 लाख एवढे वैद्यकीय सहाय्य, 75 टक्के अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास 2 लाख रुपये एवढे अर्थसहाय्य, तसेच कामगाराच्या पत्नीस जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी  रु. 15 हजार  व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी  20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य, नोंदणीकृत कामगाराने अथवा त्याच्या पत्नीने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया  केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षासाठी 1 लाख रुपये मुदत बंद ठेव, तसेच कामगारांसाठी व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारा करिता 6 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य शासनामार्फत देण्यात येईल.                               पान क्र.2 वर
पान क्र.2

आर्थिक सहाय्य योजना – या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या  कामगारांना कामावर असताना अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या वारसास 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य, नैसर्गिक मृत्य झाल्यास कुटुंबास 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य, तर घर खरेदी  वा घरबांधणीसाठी बँकेकडून  घेतलेल्या  गृह कर्जावरील 6 लाख रुपयांपर्यंत व्याजाची रक्कम अथवा 2 लाख रुपयांचे अर्थसहाय्य, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2 लाख रुपये अर्थसहाय्य, कामगाराचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित वारसदारास अंत्यविधीकरीता 10 हजार तर त्याच्या पत्नीस अथवा पतीस सलग पाच वर्षे 24 हजार आणि कामगाराला स्वत:च्या पहिल्या विवाहासाठी  30 हजार एवढे अर्थसहाय्य आणि या कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनाही राबविण्यात येणार आहे .

सामाजिक सुरक्षा  व अन्य योजना :- या योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या  बांधकाम कामगाराच्या पाल्यांना व्यक्तीमत्व विकास पुस्तक संच, बांधकामाची उपयुक्त  अवजारे खरेदीसाठी 5 हजार रुपये अर्थसहाय्य तर प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे, सुरक्षेसाठी  सुरक्षा संच पुरविणे , कामगारांना अत्यावश्यक  वस्तू संच पुरवणे आणि  कामगारांना पूर्व शिक्षण ओळख  प्रशिक्षण  योजना लागू करणे इत्यादी लाभ या योजने अंतर्गत नोंदणी केल्यामुळे बांधकाम कामगारांना मिळू शकतात.
        नोंदणीकरीता मागील वर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रांसह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकची सत्यप्रत आणि पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
 गरज आहे ती या अतिमागास आणि अशिक्षित कामगारांपर्यंत या योजनेची महती पटवून देण्याची.  याचाच अचूक मेळ साधला  अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते श्री. सुदाम गवळी यांनी...  ही माहिती वडार समाजातील बांधकाम कामगारांपर्यंत  प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी त्यांनी मला विनंती केली आणि मी या योजनेची माहिती माझ्या समाज बांधवांना सांगून त्यांच्यामध्ये आशेचा एक नवीन किरण निर्माण करु शकली... प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विषय होता आजपर्यंत शासनामार्फत अनेक योजना राबविल्या असतील पण त्या  आमच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत किंवा अशा प्रकारच्या योजनांची  शासनाकडून राबविल्या जातात याची कल्पनाही या अशिक्षित कामगारांना नव्हती..
ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाकडून राबविण्यात येत आहे. ज्या ठिकाणी बांधकामाचे काम सुरु आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून येथील कामगार अधिकारी श्री. कराड आणि त्यांच्या सहकारी कर्मचारी  यांनी कामगारांची नोंदणी करुन घेण्याचे कार्य सुरु केले आहे.
या योजनेचा सर्वस्तरातील कामगारांना लाभ व्हावा हाच हेतू समोर ठेवून मी या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभागी झाली .
00000

                                        --आशा बंडगर
                                         वरिष्ठ लिपिक
                                                           जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

No comments: