23 July, 2018

जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते लोकराज्य वारी विशेषांकाचे प्रकाशन


जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते लोकराज्य वारी विशेषांकाचे प्रकाशन
        हिंगोली, दि.23: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाच्या माहे ऑगस्ट, 2018 च्या वारी या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते निलंगा येथे करण्यात आले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

लोकराज्य ‘वारी’ संग्राह्य विशेषांक
            पंढरपुरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादवारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले.
            या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूलमंत्री श्री.पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’ असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ.द.ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू.म.पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.
            हा लोकराज्यचा विशेषांक हिंगोली जिल्ह्यातील विविध विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या अंकाची किंमत केवळ दहा रुपये इतकी असून लोकराज्य (मराठी) मासिकाची वार्षिक वर्गणी 100/- रूपये इतकी आहे. वार्षिक वर्गणी जिल्हा माहिती कार्यालय, एस-6, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, हिंगोली येथे भरता येईल. तसेच या विषयी अधिक माहितीसाठी 02456-222 635 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी आषाढी वारी संदर्भात सविस्तर माहिती करुन घेण्यासाठी लोकराज्य ‘वारी’ विशेषांक खरेदी करुन संग्रही ठेवावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात येत आहे.

****

No comments: