16 July, 2019

1 जानेवारी 2019 अर्हता दिनांकावर आधारित दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर


1 जानेवारी 2019 अर्हता दिनांकावर आधारित
दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर

        हिंगोली, दि.16: निवडणुक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन दिनांक  1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र  मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे.
            या कार्यक्रमाअंतर्गत  मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा पात्र मतदारांची नाव नोंदणी मतदार यादीत  करण्यासाठी आणखी संधी मिळावी व त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत याकरिता हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे- दिनांक 15 जुलै 2019- प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी, दि.15 ते 30 जुलै 2019 पर्यंत  दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी, दि.20,21,27,28 जुलै रोजी विशेष मोहिम, दि.13 ऑगस्ट 2019 रोजी दावे व हरकती निकाली काढणे, दि. 16 ऑगस्ट 2019 रोजी डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई, दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी अंतिमक मतदार यादी प्रसिध्दी .
            या मतदार यादीमध्ये  ज्या मतदारांची नावे समाविष्ट नाहीत अशा मतदारांना नमुना -6 मध्ये अर्ज सादर करुन  त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करता येतील. तसेच अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना -6 अ मध्ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नोंदीबाबत आक्षेप  असल्यास सदर नोंद  वगळण्यासाठी  नमुना -7 मध्ये अर्ज  सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्या नोंदीबाबत  दुरुस्ती  करावयाची असल्यास नमुना 8 मध्ये आणि एका भागातून दुसऱ्या यादी भागात नोंद स्थलांतरीत  करावयाची असल्यास विहित नमुना -8 अ मध्ये अर्ज सादर करता येतील.
            आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2019 च्या अनुषंगाने प्रत्येक मतदाराने आपले नाव प्रारुप मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करुन घ्यावी, मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास  दिनांक 15 जुलै ते 30 जुलै 2019 या कालावधीत आपले अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), संबंधित तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात जमा करावेत. तसेच मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची, यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
****

No comments: