15 July, 2019




कर्जमाफी झालेल्या शेतकरी बांधवांना त्यांची कर्जमाफी झाल्याची माहिती द्यावी
 -- पालकमंत्री अतुल सावे

        हिंगोली, दि.15: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांची कर्ज माफी झाली का नाही याची माहिती मिळत नसल्याने ते संभ्रमात आहेत. याकरीता बँकांनी ज्या शेतकरी बांधवाची कर्जमाफी झाली आहे त्यांची माहिती बँकेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शासकीय विभागाच्या आढावा बैठकीत श्री. सावे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.    
            यावेळी पालकमंत्री सावे म्हणाले की, पावसाळा सुरु होऊन सुमारे दीड महिन्याहून अधिक कालावधी झाला. परंतू जिल्ह्यात अद्यापपर्यंत समाधानाकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात 50 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.  ज्या गावांची टँकरची मागणी आहे, अशा गावांची मागणी लक्षात घेवून त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा.
समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हा टंचाई परिस्थितीचा मुकाबला करत आहे. सद्या पेरणीचा कालावधी असल्याने शेतकऱ्यांना वीजेची आवश्यकता असते. परंतू ट्रॉन्सफार्मर किंवा ऑईल नसल्याचे कारणे सांगुन महावितरण विभागामार्फत वीज पुरवठा केला जात नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. याकरीता शेतकऱ्यांना प्राधान्य देवून महावितरणने तात्काळ कार्यवाही करुन शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री सावे यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात 83 दिवस पुरेल इतका चारा शिल्लक असून, बी-बीयाणे आणि खते देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना आणि जलयुक्त शिवार योजने अंतर्गत उद्दिष्ट पूर्ण झाली असून उत्कृष्ट काम झाल्याने पालकमंत्री सावे यांनी शुभेच्छा हि दिल्या. जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष मंजूर झाला असून त्यासाठी लागाणारा निधी  कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती ही पालकमंत्री सावे यांनी यावेळी दिली. शासन व प्रशासन हे एकत्र येवून समन्वायाने जनतेची कामे करत असतात. जिल्हा प्रशासनाने  शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना राबवाव्यात. टंचाईसदृश्य परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी शासन प्रशासनाची असून, टंचाईसदृश्य गावात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: टंचाईसदृश्य भागातील पीक परिस्थिती, पाणी परिस्थिती, चाऱ्याची आवश्यकता, जनावरांची संख्या आदीची वस्तुनिष्ठ माहिती तयार करावी. जेणे करून शासनस्तरावरून शेतकरी बांधवाना योग्य ती मदत करणे शक्य होईल. येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यात ज्या त्रूटी आहेत त्यासाठी निधी उपलब्ध करुन त्या त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न येणाऱ्या कालावधीत करण्यात येईल, असे पालकमंत्री सावे यावेळी म्हणाले
            प्रारंभी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जिल्ह्याची संक्षिप्त माहिती सादर केली. तसेच यावेळी रोजगार हमी योजना, कृषी विभाग, सहकार विभाग, महावितरण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि आरोग्य या विभागाचा सविस्तर आढावा घेतला.    यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत पंडित दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रातिनीधीक स्वरुपात लाभार्थ्यांना गॅस जोडणी कार्डचे वितरण करुन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बैठकीस जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
****


No comments: