15 July, 2019


संगणकीय युगाचा विचार करुनच रोजगार प्रशिक्षणार्थींनी उद्योग उभारावेत
     -- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली दि 15: सध्याची सामाजिक परिस्थिती व संगणकीय यूगाचा विचार करुनच प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थीनी उद्योग उभारावेत अशी सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘

जागतिक  युवा कौशल्य दिन’ कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार , निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. पी. घुले, जिल्हा उद्योग केंद्राचे जि. एस. पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे.व्ही.मोडक, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे गणेश दराडे, कल्याण देशमुख आदीसह सर्व बँकेचे अधिकारी, प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व व्यावसायीक प्रशिक्षण संस्था (व्ही.टी.पी.) केंद्राचे संचालक, प्रशिक्षणार्थींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी पुढे म्हणाले की, कौशल्य विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत तसेच स्टेट बँक इंडिया मार्फत आरसेटी (RSETI) विभागाकडूनही ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे येथे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी नावापुरतेच प्रशिक्षण न घेता,समाजाची गरज भागावणा-या उद्योगांची निमिती करावी. तसेच या युवक युवतींना प्रशिक्षण देणा-या विविध व्ही.टी.पी. संस्थांनी सद्य:स्थितीत समाजास उपयोगी व प्रशिक्षणार्थींची आर्थिक गरज पूर्ण करणारा प्रशिक्षण अभ्यासक्रमच निवडावा. यामध्ये संगणकीय ज्ञानामध्ये टॅली, डीटीपी, विद्युत उपक्रमामध्ये मोटार रिवायडींग, महिलांनी ब्युटी पार्लर, शिवणकाम आदी अभ्याक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे, असे यावेळी ते म्हणाले.
कौशल्य विकास विभागाने प्रशिक्षण देण्याबरोबर इतर विभागांनीही समन्वयांनीच कार्य करावे, यामध्ये आरसेटी (RSETI)  ने महिलांना शिवणकलांचे प्रशिक्षण द्यावे, तर सर्व बँकांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांची कर्ज प्रकरणे सहानूभूती पूर्वक हाताळावीत व मुद्रा योजनेंतर्गत जास्तीत जास्त तरुण-तरुणींना रोजगारांसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याची सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यानी दिली.
कौशल्य विभाग, हिंगोली मार्फत देण्यात येणा-या महिला सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक करतांना जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले की, रोजगार व स्वयंरोजगार या दोन्ही गोष्टीवर सारखेच लक्ष देण्याची गरज असून महिलांनीही प्रशिक्षीत होवून सध्याच्या युगात आपल्या समोरील येणारी सर्व आव्हाने सोडवावीत असेही यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत दोन लाभार्थ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या देवून मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार म्हणाल्या की जिल्ह्यातील प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत  सुमारे 4 हजार 500 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण  देण्यात आले असून, त्यापैकी सुमारे 1 हजार 400 विद्यार्थ्यांनी रोजगार सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक गणेश दराडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण 54 लाभार्थ्यांना महामंडळामार्फत कर्ज वाटप करण्यात करण्यात आले असून त्यामधील 16 व्यक्तींना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी प्राथमिक स्वरुपात प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती प्रियंका कनके यांनी केले तर आभार प्रवीण रुद्रकंठवार यांनी मानले.
*****


No comments: