31 January, 2026

आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी व मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर



* पात्र अर्जदारांनी कागदपत्रे तपासणी व मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन


हिंगोली(जिमाका), दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दि. २२ डिसेंबर २०२५ च्या जाहिराती  अन्वये जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांकरिता जाहिरात प्रसिद्ध करून दि. २४ डिसेंबर २०२५ ते दि. ०२ जानेवारी २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र व अपात्र अर्जदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://hingoll.nic.in/) प्रसिद्ध करण्यात आली आहे.


या अनुषंगाने पात्र अर्जदारांची तालुकानिहाय मूळ कागदपत्रांची तपासणी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत करण्यात येणार असून दुपारी १२ ते सायंकाळी ६ या कालावधीत मुलाखती घेण्यात येणार आहेत.

त्यानुसार हिंगोली (शहर) साठी दि. ०३ फेब्रुवारी २०२६, हिंगोली (ग्रामीण) साठी दि. ०४ फेब्रुवारी २०२६, सेनगाव तालुक्यासाठी दि. ०५ फेब्रुवारी २०२६, कळमनुरी तालुक्यासाठी दि. १० फेब्रुवारी २०२६, वसमत तालुक्यासाठी दि. ११ फेब्रुवारी २०२६ तसेच औंढा नागनाथ तालुक्यासाठी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी कागदपत्र तपासणी व मुलाखती होणार आहेत.


मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याकरिता सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गैरहजर राहणाऱ्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत मुलाखतीची संधी दिली जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. पात्र अर्जदारांनी अर्जासोबत सादर केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व एक छायांकित प्रतींचा संच सोबत आणून विहित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहावे. नेमून दिलेल्या दिवशी गैरहजर राहिल्यास अर्जाचा विचार न करता उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


******


30 January, 2026

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उत्साहात साजरा

 




हिंगोली, दि. ३० : येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त आज शुक्रवार, (दि. ३०) रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदर्श महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. महेश मंगनाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. श्रीधर एस. घुगे हे उपस्थित होते.


कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात टी. एस. अकाली यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे महत्त्व विशद करून दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. महेश मंगनाळे यांनी शासकीय व न्यायालयीन कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केल्यास सामान्य नागरिकांमध्ये मराठी भाषेबद्दल आपुलकी व अभिमान निर्माण होईल, असे सांगून विविध उदाहरणांच्या माध्यमातून मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले.


या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती एस. एन. माने-गाडेकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ पी. जी. देशमुख, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ आर. एस. रोटे, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. बी. कुरणे, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्रीमती व्ही. व्ही. सावरकर, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) पी. जी. महाळकर, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती डी. व्ही. भंडारी, तृतीय सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती एस. एस. पळसुले,  यांच्यासह जिल्हा न्यायालयातील विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर)  वि. म. मानखैर यांनी केले.

*******


समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा परिषदेतील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा–२०२५” चे आयोजन करण्यात आले आहे.


ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दि. ०३ व ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्येकी तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने दि. २९ जानेवारी, २०२६ रोजी www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.


परीक्षार्थी उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासह अधिक माहितीसाठी www.mscepune.in या संकेतस्थळास भेट द्यावी. प्रवेशपत्र डाउनलोड करताना येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी १८०० २२२ ३६६ / १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच https://cgrs.ibps.in/ या लिंकवर तक्रार नोंदवावी.


प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आवश्यक असलेला लॉगिन आयडी (रजिस्ट्रेशन नंबर) हा आवेदनपत्रावर उपलब्ध असून, पासवर्ड म्हणून उमेदवाराची आवेदनपत्रावरील जन्मतारीख वापरावी, याची सर्व परीक्षार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी कळविले आहे.

*******


बौद्ध समाजातील संस्थांसाठी पायाभूत सुविधांकरिता अनुदान योजना * २० फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 30 : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्य असलेल्या तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या दि. 7 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाअन्वये सन २०२५-२६ या वर्षासाठी अनुदान योजना राबविण्यात येणार आहे.


या योजनेंतर्गत पात्र संस्थांना 10 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार असून, दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेली योजनेची कार्यपद्धती, पात्रता, अटी व शर्ती कायम राहतील. तसेच शासन निर्णयात नमूद केलेल्या पायाभूत सोयी-सुविधांसाठीच अनुदान देण्यात येणार आहे.


हे अनुदान प्राप्त करण्यासाठी इच्छुक शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या विहित नमुन्यातील प्रपत्र-१, प्रपत्र-२, प्रपत्र-३ व प्रपत्र-५ मध्ये आवश्यक माहिती संगणकीकृत स्वरूपात भरून, शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून सविस्तर प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दिनांक २० फेब्रुवारी, २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.


विहित मुदतीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.


*******

जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन




        हिंगोली (जिमाका), दि. 30 :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि आदर व्यक्त करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचारी यांनी मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहिली.

            यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

******

29 January, 2026

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत पात्र प्रस्तावांना जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मान्यता

 

  

हिंगोली(जिमाका), दि. 29 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, १९८९ अंतर्गत प्रथम खबर अहवालानुसार तसेच दोषारोप अहवालानुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर नियम व निकष पूर्ण करणाऱ्या पात्र प्रस्तावांना समितीने मान्यता दिली.

अत्याचार पीडितांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा तसेच प्रकरणांबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

 

******

शालांत व उच्च माध्यमिक परीक्षांसाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

 


 

कॉपीमुक्त परीक्षेसाठी कडक उपाययोजना करा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारीमार्च २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्यासह पोलीस विभाग, महावितरण, डायट व इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

परीक्षा निर्भय व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी भरारी पथक व बैठे पथक नियुक्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी केंद्रनिहाय नोडल अधिकारी नेमावेत तसेच पर्यवेक्षक व समवेक्षकांची नियुक्ती करावी. बैठे पथकात नायब तहसीलदार व विस्तार अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक महिला व एक पुरुष पोलीस कर्मचारी, तर संवेदनशील केंद्रांवर दोन महिला व दोन पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असेही त्यांनी सांगितले.

गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी भरारी व बैठे पथकांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकार आढळून आल्यास संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी माहिती देताना सांगितले की, इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून जिल्ह्यातील 54 परीक्षा केंद्रांवर 16 हजार 687 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यापैकी 4 परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून 39 परीक्षा केंद्रांवर 15 हजार 241 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 7 परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत. दहावीच्या 54 व बारावीच्या 39 अशा सर्व परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एक बैठे पथक नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

*******

महाशिवरात्री यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा

 


 

* भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे दिले निर्देश

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : महाशिवरात्रीनिमित्त येत्या 15 फेब्रुवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे 8 वे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र औंढा नागनाथची यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

महाशिवरात्री यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. यात्रेदरम्यान पार्किंग व्यवस्था, स्वच्छता, पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालये, रुग्णवाहिका, आरोग्य पथके, निवास व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनासाठी स्क्रिनिंग व्यवस्था तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविणे आदी बाबींचा समावेश असलेला मंदिर सुरक्षा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

यात्रेच्या कालावधीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी बैठकीत स्पष्ट केले.

 

******

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक योजना

 


 

अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन योजनेसाठी आवेदनपत्र सादर करावे

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी नंतर नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थांच्या सहाय्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी (नीट / सीईटी / जेईई) मार्गदर्शन देण्यासाठी सन 202627 या शैक्षणिक वर्षाकरिता विशेष योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील खाजगी तसेच मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी मार्च 2026 मध्ये इयत्ता 10 वीच्या परीक्षेस बसलेले आहेत आणि नीट, सीईटी किंवा जेईई परीक्षेसाठी इच्छुक आहेत, अशा विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात आवेदन पत्र भरावे.

सदर भरलेली आवेदन पत्रे दिनांक 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत संबंधित प्रकल्प कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी, जि. हिंगोली यांनी केले आहे.

 

******

शेतक-यांनी कापूस पिकातील फरदड काढून टाकावी

 

•  किड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन


हिंगोली, दि. २९ (जिमाका) : खरीप हंगाम सन २०२५ मध्ये हिंगोली जिल्ह्यात सुमारे ३७,२५९ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आतापर्यंत कापसाच्या ३–४ वेचण्या पूर्ण झाल्या असल्या तरी जानेवारी महिना संपत आला असूनही अनेक ठिकाणी कापूस पिक शेतात उभे असल्याचे निदर्शनास आले आहे.


शेतात उभे असलेले कापूस पीक मातीतील पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेत असल्यामुळे कीड व रोगांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. कापूस पिकातील कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच पुढील हंगामातील उत्पादन वाढीसाठी फरदड कापूस निर्मूलन करणे अत्यंत आवश्यक आहे. फरदड कापूस हा गुलाबी बोंडअळी, तुडतुडे, मावा तसेच विविध रोगांचा आश्रयदाता ठरतो, त्यामुळे पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.


या पार्श्वभूमीवर कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना कापूस काढणीनंतर उरलेली फरदड पिके तात्काळ उपटून नष्ट करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेतात उरलेली कापसाची झाडे मुळासकट उपटून, चिरडून किंवा खोल नांगरट करून नष्ट करावीत. यामुळे किडींचे जीवनचक्र खंडित होऊन पुढील हंगामात कीड व्यवस्थापनास मदत होणार आहे.



फरदड निर्मूलन केल्यास गुलाबी बोंडअळी व इतर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, रोगांचा प्रसार आटोक्यात येतो, पुढील हंगामात उत्पादनाचा दर्जा सुधारतो तसेच कीटकनाशकांवरील खर्चात बचत होते. तरी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फरदड कापूस शेतात ठेवू नये व तात्काळ निर्मूलन करून मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.


*****

27 January, 2026

प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य कवायत संचलन * विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली

 





हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद हिंगोलीच्या शिक्षण विभागामार्फत संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर भव्य प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळांमधील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली.

या सोहळ्याला पालकमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

शिक्षण विभागातर्फे तयार करण्यात आलेले विद्यार्थ्यांचे संचलन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. तिरंगी झेंड्याच्या सन्मानात २०० विद्यार्थ्यांनी नामदेव परेड ग्राउंडवर तालासुरात कवायती सादर केल्या. "भारत माता की जय" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

शिक्षण विभागाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आसावरी काळे, गटशिक्षणाधिकारी दत्तराव नांदे तसेच संतोष बांगर, श्री. व्यवहारे, श्री. रिझवान, श्री. सुधाकर गावंडे, विजय बांगर या सर्वांनी विशेष प्रयत्न केले.

प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा शिस्त आणि देशप्रेमाच्या भावनेने संपन्न झाला, ज्याचे कौतुक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.

******

वसमत हळदीच्या भौगोलिक मानांकनासाठी शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी – डॉ. पी. पी. शेळके

 


हिंगोली, दि. 27 : हिंगोली जिल्ह्याची ओळख असलेल्या वसमत हळदीला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळवून देण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, या मानांकनाचा अधिकृत वापर करता यावा यासाठी वसमत व परिसरातील सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी केले आहे.

आज मंगळवार, (दि. 27) रोजी वसमत येथील सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत हळदीच्या मानांकनासंदर्भात विशेष ऑनलाईन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नाबार्ड, पुणे विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, नाबार्डचे हिंगोली जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. लहाने, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके तसेच सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड उपस्थित होते.

या बैठकीत नाबार्डच्या पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘वसमत हळद’ जी.आय. टॅगचा अधिकृत वापर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला. ही प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने सूर्या एफपीसीला सहकार्य करावे तसेच शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना नाबार्डकडून देण्यात आल्या.

यावेळी माहिती देताना सांगण्यात आले की, शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली असून, अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणीसाठी हळद पीक पेरा दर्शविणारा सातबारा उतारा, आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि केवळ १० रुपये नोंदणी शुल्क आवश्यक आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. पी. पी. शेळके म्हणाले की, “श्री. प्रल्हाद बोरगड व सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने वसमतच्या हळदीला राष्ट्रीय व जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. या प्रक्रियेत कृषी विज्ञान केंद्र पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील.”

भविष्यातील बाजारपेठ, दरवाढ आणि हळदीच्या ब्रँडिंगचा लाभ लक्षात घेता वसमत व परिसरातील सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या तेलगाव (ता. वसमत) येथील कार्यालयात तातडीने संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. शेळके यांनी केले. 

या बैठकीस डॉ. हरिदास जटाळे यांच्यासह इतर मान्यवरही ऑनलाईन उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि., कार्यालय वसमत–परभणी रोड, तेलगाव, ता. वसमत, जि. हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा, आवाहन करण्यात आले आहे.

*******

प्रजासत्ताक दिनी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी घेतली बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा

 



हिंगोली, दि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.


यावेळी महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांच्या पत्रानुसार प्रजासत्ताक दिनी बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेतली. तसेच बालविवाह मुक्त भारत मोहिमेच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला पालकमंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.


या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. आर. दरपलवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांच्यासह सर्व कर्मचारी, तसेच विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने बालविवाह प्रतिबंध व बालहक्क संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


*******

26 January, 2026

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयात ई-सेवा केंद्राचे उद्घाटन

 

न्यायालयीन सेवा अधिक सुलभ व पारदर्शक होणार – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली




हिंगोली, दि. 26 : येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी ई-सेवा केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या उद्घाटन समारंभास जिल्हा न्यायाधीश-1 श्रीमती एस. एन. माने (गाडेकर) , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 पी. जी. देशमुख , दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व्ही. एम. मानौर, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्रीमती व्ही. व्ही. सावरकर, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) पी. बी. महाळकर, तृतीय सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती एस. एस. पळसुले, तसेच अॅड. एस. आर. घुगे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती.

ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून न्यायालयीन कामकाज अधिक जलद, सुलभ व पारदर्शक होणार असून जास्तीत जास्त प्रकरणे ई-सेवा केंद्रामार्फत दाखल करण्यात यावीत, तसेच विधिज्ञ व पक्षकारांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी यावेळी केले.

ई-सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

*******


प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार

 







हिंगोली, दि. 26 (जिमाका): आज ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

 यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सोयाबीन उत्पादक शेतकरी अतुल नलगे, प्रल्हाद साबळे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 मध्ये पर्यावरणपूरक गणेश मंडळ आजेगाव यांना द्वितीय पुरस्कार तर संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल प्रांजल सोनटक्के, जिल्हा प्रशासनातर्फे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार बँकींग विकासासंदर्भांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राहुल बावणे, अमोल जावळे, दिपक बारहाते, सुजित झोडगे, शालिकराम जाधव या बँक अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 

 यावेळी हिंद दी चादर कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेतील पार्थ इंगोले, संध्या धुळे, अक्षरा देशमुख जान्हवी घेणेकर आणि समृद्धी घुगे तर शाळांमध्ये पीएमश्री जिल्हा परिषद आखाडा बाळापूर आणि पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ यांचाही सत्कार करण्यात आला.  

परेडदरम्यान कृषि विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, दामिनी पथक, श्वान पथक, वज्र वाहन, फॉरेन्सिक लॅब, अग्निशामक दल, आरटीओ, ॲम्बुलन्स, बालविवाह प्रतिबंधक अभियान आदी पथकांनी यावेळी संचलन केले. तसेच पोलीस स्टेशन कळमनुरी, एसआरपीएफ गट क्रमांक 12, होमगार्ड, वाद्यपथक, सेक्रेट हार्ट स्कूल आणि बहुविध प्रशाळा हिंगोलीच्या विद्यार्थ्यांनीही पथसंचलन करत उपस्थितांची वाहवा मिळविली. 

 यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती होण्यासाठी चित्ररथातून करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाचा अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान हे 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारीर्पंत तपासणी, निदान आणि उपचार जनजागृती तसेच कृषि विभागाचा कृषिविषयक विस्तार एआय वर आधारित जनजागृती रथ जिल्ह्यात फिरणार आहे. त्यांचेही पथसंचलन यावेळी झाले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडित अवचार यांनी केले. तर आम्रपाली चोरमारे यांनीही परिश्रम घेतले. 

 ******

प्रजासत्ताक दिनी राज्य शासनाचा विकासाचा संकल्प : शेतकरी, आरोग्य, शिक्षण व रोजगारासाठी शासनाची भरीव कामगिरी– पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 



* संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम 

* विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार 


हिंगोली, दि. 26 (जिमाका): जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी आणि लोककल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांमुळे शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात भरीव व सकारात्मक बदल घडून येत आहे. या सर्व योजनांच्या माध्यमातून राज्य शासन सर्वांगीण विकासाचा संकल्प करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. 

  हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. 

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार चंद्रकांत उर्फ राजु नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलभ रोहण, अपर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिगांबर माडे, सेनगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी योगेशकुमार मीना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, अधिष्ठाता चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, अश्विन माने, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, प्रदीप नळगीरकर, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, आसावरी काळे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार व सामाजिक न्याय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होत असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी पाच गावांमध्ये एकूण 22 किलोमीटर शेत व पाणंद रस्त्यांची कामे सुरू असून, शेतकऱ्यांना थेट बांधापर्यंत सहज पोहचणे सोपे आणि सुलभ होणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यावेळी म्हणाले. 

यंदा सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे ४७५.९६ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित ई-केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ॲग्रीस्टॅक योजनेतून शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत असून, कृषी योजनांचा लाभ अधिक सुलभ झाला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून सिंचनासाठी ७४७ शेतकऱ्यांना दीड कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. तसेच कृषी यांत्रिकीकरणासाठी ४४१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून २७८ शेतकऱ्यांना १.४१ कोटी रुपयांचे अनुदान शासनाने वितरीत केल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

हिंगोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीतून दर्जेदार आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ‘संजीवनी अभियान’ अंतर्गत जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड मिळाला असून, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तो स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. 

‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत गावोगावी सर्वेक्षण, तपासणी, उपचार व समुपदेशन सुरू आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन (एन-क्वास) कार्यक्रमांतर्गत रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मानांकन करण्यात येत असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी जिल्ह्यात रोजगार, उद्योग व महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून २६७६ युवकांना प्रशिक्षण देऊन २३.७१ कोटी रुपयांचे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ११४५ लाभार्थ्यांना ८६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून, व्याज परतावा थेट खात्यावर जमा करण्यात आला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत १५ हजारांहून अधिक महिलांचे बचत गटांच्या माध्यमातून संघटन झाले असून, उद्योग व रोजगारासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 ‘सेवादूत हिंगोली’ वेब प्रणाली, व्हॉट्सॲप चॅटबोट (९४०३५ ५९४९४) व ‘से हाय टू कलेक्टर’ (८५४५० ८५४५०) या प्रणालींमुळे नागरिकांच्या तक्रारींचे जलद, पारदर्शक व सुलभ निराकरण होत आहे. DM Dashboard द्वारे सर्व विभागांची माहिती एकत्रित उपलब्ध करून देत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, स्वाधार योजना व वसतिगृह सुविधा राबविण्यात येत आहेत. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा व अपंग योजना अंतर्गत हजारो लाभार्थ्यांना थेट बँक खात्यावर अनुदान वितरित करण्यात आले आहे. 

तसेच शिधापत्रिकाधारकांसाठी रोख हस्तांतरण योजना, ग्रामीण रोजगार हमी योजना व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांद्वारे दुर्बल घटकांना मोठा आधार मिळत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानातील समता, सामाजिक न्याय, विकास व स्वावलंबनाच्या मूल्यांना अनुसरून जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेली ही विकासयात्रा अधिक गतिमान करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. यावेळी सरजुदेवी कन्या विद्यालय, शां. मु. दराडे विद्यालय, मौलाना आझाद उर्दु हायस्कुल आणि सरस्वती विद्या मंदिर, हिंगोलीतील विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर संगीत कवायत केली. यावेळी बालविवाह प्रतिबंधक शपथ आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.  

*****








जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा





 

 • जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण

हिंगोली, दि. २६, (जिमाका):

जिल्हाधिकारी कार्यालयात भारताचा ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन आज सकाळी साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. 


यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, अश्विन माने, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, प्रदीप नळगीरकर यांच्यासह विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. 


यावेळी संविधानाची प्रस्तावना वाचन करण्यात आले. तसेच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले व संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.पोलीसांच्या बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्य गीत सादर केले.


कार्यक्रमास जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****


*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "हिंद दी चादर " शहीदी समागम कार्यक्रमासाठी नांदेड येथे आगमन*

नांदेड,दि.२५ (जिमाका) “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबई येथून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले.मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे आगमन होताच विमानतळ परिसरात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन प्रसंगी पालकमंत्री श्री.अतुल सावे,खासदार अशोक चव्हाण,खासदार डॉ.भागवत कराड,खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड,राजेश पवार, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पर्यावरण मंत्री श्रीमती. पंकजा मुंडे व आमदार रवींद्र चव्हाण यांचेही नांदेड येथे आगमन झाले.त्यानंतर मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस हे विमानतळावरून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्तच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.
                ************
*हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी”*

*’बोले सो निहाल सत श्री अकाल' च्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतले दर्शन*

नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.

आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.  

देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माच्या भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. 

भाविकांच्या सोयीसाठी 

आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांसाठी लोकसहभागातून चहा, अल्पोपहार, ज्यूस, विविध स्टॉल उभारण्यात आलेले आहेत.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश दिला जात आहे.
००००”
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन* 

नांदेड दि.२५ (जिमाका) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज नांदेड येथील गुरु गोविंद सिंघ जी विमानतळ येथे बारामती येथून विमानाने आगमन झाले.त्यांच्या आगमन प्रसंगी पालकमंत्री श्री.अतुल सावे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती.

श्री.अजित पवार यांचे आगमन प्रसंगी पालकमंत्री श्री.अतुल सावे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,आमदार प्रताप पाटील चिखलीकर,विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व मनपा आयुक्त महेश डोईफोडे यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन त्याचे स्वागत केले. 

उपमुख्यमंत्री श्री.पवार हे विमानतळ येथून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित " हिंद दी चादर " श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शासकीय वाहनाने रवाना झाले.
              *************

25 January, 2026

*हिंद दी चादर शहीदी समागमात जनकल्याण चिकित्सा शिबिरास पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*


नांदेड, दि. २४ जानेवारी :- हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जनकल्याण चिकित्सा शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. या शिबिरात पहिल्या दिवशी भाविकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसह विविध आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तसेच औषधे, काठ्या, कृत्रिम अवयव व चष्म्यांचे वाटप करण्यात येत असून हजारो नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेत आहेत. या शिबिरात श्री गुरु ग्रंथ साहिब सेवा संस्थेच्या गुरु का लंगर डोळ्याचा दवाखानाच्या वतीने भरीव सहभाग देऊन योगदान देत आहेत. 


*कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण*

कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रंगमंच परिसरात तसेच इतर दर्शनी भागात, लंगरच्या ठिकाणी स्क्रीनिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासोबतच कार्यक्रमाची लाइव्ह लिंक https://youtube.com/live/Am_ofc2n8ig?feature=share उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पिण्याचे पाणी व सुरक्षा, लंगरची व्यवस्था यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा शहीदी समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००
भक्तीमय वातावरणात श्री गुरुग्रंथ साहिबांचे विधीवत विराजमान

नांदेड, दि. २४ जानेवारी:- असर्जन परिसरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरुग्रंथ साहिबांचे अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात विधीवत विराजमान झाले. 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला.

विराजमान प्रसंगी गुरुबाणीचे मंगल पठण, अरदास व कीर्तन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गुरुबाणीच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेने भारावून गेला. भाविकांनी सर्व मर्यादांचे पालन करीत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत गुरुग्रंथ साहिबांना नमन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पाणी व सुरक्षा यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
०००००
*श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त निघालेल्या भव्य नगर कीर्तनात अभूतपूर्व उत्साह!* 

'बोले सो निहाल'चा जयघोष, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

नांदेड, दिनांक २४ (जिमाका) : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त आज नांदेड नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. 'बोले सो निहाल... सत श्री अकाल'चा गगनभेदी जयघोष, आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आणि या सोहळ्यात संत, भाविक, लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात आज भव्य 'नगर कीर्तन' सोहळा पार पडला.

या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज (दि. २४) सकाळी ८ वाजता तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी येथून प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुद्वारामध्ये विधिवत अरदास करण्यात आली. यानंतर गुरुद्वाराच्या गेट क्रमांक १ जवळ श्री गुरु ग्रंथ साहिबजींची पालखी येताच नांदेड पोलीस दलाच्या वतीने (Guard of Honor) विधिवत 'मानवंदना' देण्यात आली. या सोहळ्याचे सर्वात विलोभनीय दृश्य म्हणजे हेलिकॉप्टरने गुरुद्वारावर केलेली पुष्पवृष्टी. 

भव्य नगर कीर्तन मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी, भाई जोतिनदर सिंघ जी, मुख्य ग्रंथी भाई कश्मीर सिंघ जी, भाई रामसिंघ जी, भाई गुरुमीत सिंघ जी या पंच प्यारे साहिबान यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काढण्यात आले.

सुशोभित आणि भव्य रथामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान होते. या पवित्र पालखीमध्ये भाई कश्मीर सिंघ जी यांनी पवित्र सेवा अत्यंत भक्तीभावाने केली.

 राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण, शहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक आदींसह लोकप्रतिनिधी यांनी विशेष उपस्थिती लावून गुरुचरणी नतमस्तक होत कीर्तनात सहभाग नोंदवला.

तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार (भा.पो.से.) आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग (से .नि. भाप्रसे), त्यांचे सहकारी जसविंत सिंघ (बॉबी) आणि अधीक्षक हरजितसिंग कडेवाले यांनीही उपस्थित राहून नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.

या नगर कीर्तनात शीख धर्माची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकधारा यांचा संगम पाहायला मिळाला. मिरवणुकीच्या अग्रभागी शीख तरुणांची थरारक 'गतका' प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती, तर हजारो शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले 'लेझिम' नृत्य आणि ढोल-ताशांचा गजर वातावरणात उत्साह भरत होता. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात 'मानवता की सच्ची मिसाल' आणि 'हिंद दी चादर' असे फलक घेऊन सामाजिक संदेश दिला.

 नगर कीर्तन गुरुद्वारा गेट क्रमांक १ वरून गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद, तिरंगा चौक, रामसेतू, रवी नगर, नागार्जुन स्कूल मार्गे मुख्य कार्यक्रमस्थळी म्हणजेच 'मोदी मैदान' येथे पोहोचले.

*शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत* 
गेट क्रमांक १ ते मोदी मैदान या अंदाजे चार किलोमीटरच्या मार्गावर एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रांगा लावून शिस्तीत उभे राहत रथाचे भव्य स्वागत केले आणि गुरु ग्रंथ साहिबजींचे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी केलेली फुलांची उधळण आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थित भारावून गेले. या संपूर्ण मार्गावर नांदेडकरांनी आपल्या घरांसमोर सडा-रांगोळी काढून नगर कीर्तनाचे जंगी स्वागत केले.
*हिंद दी चादर शहीदी समागमात जनकल्याण चिकित्सा शिबिरास पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*


नांदेड, दि. २४ जानेवारी :- हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जनकल्याण चिकित्सा शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. या शिबिरात पहिल्या दिवशी भाविकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसह विविध आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तसेच औषधे, काठ्या, कृत्रिम अवयव व चष्म्यांचे वाटप करण्यात येत असून हजारो नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेत आहेत. या शिबिरात श्री गुरु ग्रंथ साहिब सेवा संस्थेच्या गुरु का लंगर डोळ्याचा दवाखानाच्या वतीने भरीव सहभाग देऊन योगदान देत आहेत. 


*कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण*

कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रंगमंच परिसरात तसेच इतर दर्शनी भागात, लंगरच्या ठिकाणी स्क्रीनिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासोबतच कार्यक्रमाची लाइव्ह लिंक https://youtube.com/live/Am_ofc2n8ig?feature=share उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पिण्याचे पाणी व सुरक्षा, लंगरची व्यवस्था यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा शहीदी समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००
*सेवाभाव, समता आणि बंधुतेचा संदेश देणारी ‘लंगर सेवा’*

*‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य, लाखो भाविकांनी घेतला सेवेचा लाभ*


नांदेड दि.24:‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमात लंगर सेवेच्या माध्यमातून सेवाभाव, समता व मानवतेचे अनोखे दर्शन घडत आहे. धर्म, जात, भाषा, प्रांत यांचा कोणताही भेद न करता हजारो भाविकांना एकत्र बसवून भोजन देणारी ही लंगर परंपरा या कार्यक्रमाची खरी आत्मा ठरते आहे. 


हिंद-दी-चादर कार्यक्रमासाठी विविध राज्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातून भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या भाविकांना मुख्य मंडपालगत उभारण्यात आलेल्या ८ मंडपाच्या माध्यमातून लंगर सेवा दिली जात आहे. लंगर सेवा ही केवळ भोजन व्यवस्था नसून मानवी समानतेचा आणि नि:स्वार्थ सेवेचा संदेश देणारी गौरवशाली परंपरा आहे. ‘सर्व मानव समान आहेत’ या तत्त्वावर आधारित ही सेवा हिंद-दी-चादर कार्यक्रमात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून, लाखो भाविक, साधुसंत, नागरिक, स्वयंसेवक आणि पाहुण्यांना भोजन देण्यात येत आहे. 


*स्वयंसेवकांचा सेवायज्ञ*
या लंगर सेवेत शीख बांधवांसह विविध सामाजिक संस्था, युवक-युवती, महिला, स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. भाजी कापणे, पोळ्या तयार करणे, अन्न शिजवणे, स्वच्छता राखणे, पंगतीत सेवा करणे ही कामे प्रत्येक कामात ‘सेवा हीच साधना’ या भावनेतून स्वयंसेवक करीत आहेत. अनेक जण तर पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत न थकता सेवा देत आहेत.

*समतेचे प्रत्यक्ष दर्शन*
लंगरमध्ये श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, वृद्ध-लहान असा कोणताही भेद नाही. सर्वजण एकाच पंगतीत, जमिनीवर बसून भोजन ग्रहण करतात. यामुळे सामाजिक समतेचे प्रत्यक्ष दर्शन भाविकांना घडत आहे. 

*नेटके व्यवस्थापन*
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून लंगर सेवेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी, आरोग्य तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
*शीख समाजाचा इतिहास उलगडणारे 'विरासत-ए-सीख' प्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण*

▪️शीख योद्ध्यांनी वापरलेले शस्त्रात्रे पाहण्याची संधी; प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस 

▪️शीख समाजासह नऊ समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची सरल आणि सोप्या भाषेत सचित्र मांडणी

नांदेड, दि. 24 : शहरातील मोदी मैदानाच्या भव्य 52 एकर परिसरात सुरू असलेल्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त शीख समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे 'विरासत-ए-सीख' हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन भाविकांसाठी आकर्षण ठरत असून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले भाविक आवर्जून प्रदर्शनाला भेट देत आहेत. 

शीख धर्माच्या स्थापनेपासून ते गुरू गोविंद सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व गुरूंचा इतिहास, त्यांनी दिलेले योगदान सचित्र स्वरूपात मांडण्यात आला आहे. विशेषतः हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबत शीख योद्ध्यांनी वापरलेली विविध शस्त्रास्त्रे या प्रदर्शन दालनात ठेवण्यात आली आहेत. शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक जी ते शेवटचे गुरु गोविंद सिंगजी यांचा इतिहास व श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे कार्य तसेच शीख धर्मासोबतच सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजातील महापुरुषांचाही इतिहास या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला आहे. 

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले भाविक आवर्जून 'विरासत-ए-सीख' या प्रदर्शनाला भेट देत आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाचे दालन भाविकांनी तुडुंब भरल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. आज, 25 जानेवारी 2026 रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

****
हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

नांदेड, दि. २५ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर वाढून भाविकांची सेवा केली. 

जिल्हाधिकारी यांनी रांगेत बसलेल्या भाविकांना लंगर सेवा केल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

सेवा, समता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या लंगर परंपरेचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले. जिल्हाधिकारी यांनी लंगर सेवेत सहभागी होत शीख परंपरेतील सेवाभाव, मानवता व समतेच्या मूल्यांना अभिवादन केले.ही लंगर सेवा २४ तास भाविकांच्या सेवेसाठी खुली आहे.

शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे देश-विदेशातून भाविक उपस्थित असून, संपूर्ण परिसर भक्तिमय व सेवाभावी वातावरणाने भारावून गेला आहे. या कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचा जागर करण्यात येत आहे.
०००००

24 January, 2026

*‘हिंद दी चादर’ अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांचा*
 *मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते सन्मान*
हिंगोली, दि. 23 (जिमाका): श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीद समागम कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर’ अंतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा आज शुक्रवार, (दि23) रोजी जिल्हा परिषद कार्यालयातील नक्षत्र सभागृह येथे समारंभात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी संदीपकुमार सोनटक्के आणि आसावरी काळे तसेच गटशिक्षणाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीद समागम दिनानिमित्त तालुकानिहाय विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात योगदान दिल्याबद्दल मुख्याध्यापकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वक्तृत्व व गायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे संपूर्ण नक्षत्र सभागृह राष्ट्रभक्ती व सांस्कृतिक भावनेने भारावून गेले.
 यावेळी गायन स्पर्धेत पार्थ इंगोल हा प्रथम, संख्या सुधाकर धुळे द्वितीय, रुपाली पोटेने तृतीय क्रमांक मिळविला. वक्तृत्व स्पर्धेत अक्षरा देशमुख प्रथम प्राजक्ता शेळके व किरण मांदळे द्वितीय तर पूर्वी जाधव तृतीय, निबंध स्पर्धेत जान्हवी घेणेकर, अर्चना पाईकराव ‍द्वितीय, प्रिया मुळे व वेदिका काकडेने तृतीय क्रमांक मिळविला आणि चित्रकला स्पर्धेत समृद्धी घुगे प्रथम, तृप्ती पतंगे द्वितीय तर शालिनी पवार आणि देवराव गिऱ्हे हे तृतीय आले असून, त्यांचा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. 
 याच कार्यक्रमात जिल्ह्यात पहिल्या पाच क्रमांकाने पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला आखाडा बाळापूर कळमनुरी प्रथम, पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा सातेफळ, वसमत द्वितीय, जिल्हा परिषद कन्या प्रशाला हिंगोली तृतीय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येडूद औंढा नागनाथ, चौथी आणि पाचव्या क्रमांकावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हाळशी तालुका सेनगाव यांचा क्रमांक लागला. 
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, संस्कार व सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत करणारा ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
 ******
*हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमासाठी विविध २० ठिकाणांहून मोफत बससेवा*
 
*भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*
 
नांदेड, दि. २३ जानेवारी : “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर दिनांक २४ व २५ जानेवारी, २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविक व नागरिकांना सहजपणे उपस्थित राहता यावे, यासाठी शहर व परिसरातील एकूण २० ठिकाणांहून मोदी मैदानापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
ही बससेवा रेल्वे स्टेशन, बसस्थानक, पासदगाव-तरोडा नाका, सांगवी-चैतन्यनगर, शंकरराव चव्हाण चौक-साठेचौक, सिडको-लातूर फाटा, धनेगाव-वाजेगाव, राजकॉर्नर-शिवाजीनगर, सराफा चौक-जुना कौठा मोंढा, ढवळे कॉर्नर-सिडको, लिंबगाव-छत्रपती चौक-मोर चौक, नाळेश्वर, आसना-राजकॉर्नर, विष्णुपुरी, कामठा-नमस्कारचौक, हडको, निळा-जयभवानी चौक, सोनखेड-वाडीपाटी-विष्णुपुरी, उस्माननगर-वडगाव-सिडको तसेच मारतळा-जवाहरनगर-तुप्पा-चंदासिंग कॉर्नर येथून मोदी मैदान येथील कार्यक्रम स्थळापर्यंत देण्यात आली आहे.
 
या मोफत बससेवेचा लाभ घेवून सर्व भाविक व नागरिकांनी “हिंद दी चादर” शहीदी समागम कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
*हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज*

*जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण*

*कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही*

नांदेड, दि. २३ जानेवारी :- नांदेड येथे उद्यापासून दोन दिवस “हिंद-दी-चादर” अंतर्गत शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळी श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य महानगर कीर्तन सकाळी ८ वाजता गुरुद्वारा गेट क्रमांक १ येथून प्रारंभ होऊन गुरुद्वारा चौक – महावीर चौक – वजिराबाद मार्केट – वजिराबाद चौक – तिरंगा चौक – रामसेतू दादरा – रवी नगर – नागार्जुन पब्लिक स्कूल – मामा चौक या मार्गाने मोदी मैदान, मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे.

या मार्गावरील सर्व नागरिकांनी आपल्या घरांसमोर व दुकानांसमोर रंगीबेरंगी फुले, रांगोळी, विद्युत रोषणाई व दिव्यांच्या माध्यमातून सजावट करून पालखीचे स्वागत करावे व या भव्य महानगर कीर्तनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कार्यक्रमस्थळी येण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोफत वाहनसेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमस्थळी आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात आली आहेत.

*हिंद-दी-चादर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेशासाठी कोणत्याही पासची आवश्यकता नाही*

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

०००००

22 January, 2026

 शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था


लाखो भाविकांसाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब व लंगर साहिब गुरुद्वारांकडून मोफत भोजन सेवा


नांदेड, दि. २२ जानेवारी :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या भोजनासाठी १२ भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून, ही सेवा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा व लंगर साहिब गुरुद्वारा यांच्या वतीने पुरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग स्थळांपासून रेल्वे स्थानक, बसस्थानक व विमानतळ परिसरात विविध ठिकाणी मोफत सेवा स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा तसेच गुरुद्वारा लंगर साहिब येथेही भाविकांसाठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच या दोन गुरुद्वारांद्वारे भव्य निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या मोफत लंगर सेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांनी केले आहे.

०००००

 ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड शहरात वाहतूक नियमन


नांदेड, दि. 22 जानेवारी :- “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमानिमित्त दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरात देशातील व राज्यातील अनेक अतिमहत्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. हे सर्व मान्यवर नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.


या कार्यक्रमास देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होणार असल्याने नांदेड शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील शांतता, सुव्यवस्था व वाहतुकीचे सुरळीत नियोजन राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक नियमनाबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे.


या कालावधीत व्हीव्हीआयपी दौऱ्यादरम्यान तात्पुरत्या स्वरूपात आसना ब्रिज–शंकरराव चव्हाण चौक–गुरुद्वारा मालटेकडी रोड–मालटेकडी ओव्हरब्रिज, नमस्कार चौक ते नाईक चौक, अण्णाभाऊ साठे पुतळा, हिंगोली गेट ओव्हरब्रिज, चिखलवाडी चौक, आय.टी.आय. ते अण्णाभाऊ साठे पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा ते नाईक चौक (आनंदनगरकडे), हिंगोली गेट अंडरब्रिज ते अण्णाभाऊ साठे पुतळा, चिखलवाडी ते हिंगोली गेट ओव्हर/अंडरब्रिज, चिखलवाडी ते गुरुद्वारा हनुमान मंदिर–भगतसिंग चौक, बर्की चौक ते जुना मोंढा मार्गे वजिराबाद, कविता हॉटेल ते जुना मोंढा कौठा, एम.जी. हेक्टर शोरूम ते साई कमान कौठा, भगतसिंग चौक ते श्रीराम चौक (पूर्व बाजू), अहिल्यादेवी होळकर चौक–मामा चौक, बी.डी.डी.एस. ऑफिस ते मामा चौक–श्रीराम चौक, लिंबगाव ते वाघी रोड–हसापूर मार्ग (कार्यक्रमास येणारी वाहने वगळून), रविनगर ते नागार्जुन शाळा तसेच कौठा चौकी ते रविनगर, बसवेश्वर पुतळा ते अहिल्याबाई होळकर चौक–पदमजासिटी–भगतसिंग चौक हे मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहेत.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून चिखलवाडी–अण्णाभाऊ साठे पुतळा–नाईक चौककडे जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोर्टाच्या पाठीमागून हिंगोली गेट अंडरब्रिज मार्गे गोकुळनगरकडे वळविण्यात येईल. तसेच वजिराबाद चौक–आय.टी.आप–नवीन मोंढा–महादेव दाल मिल मार्ग, महादेव दाल मिल रोड क्रमांक 26, शिवाजी महाराज पुतळा–रेल्वे स्टेशन–हिंगोली गेट, बसवेश्वर चौक ते लातूर फाटा, लिंबगाव–भवानी चौक–छत्रपती चौक मार्गे वाहतूक सुरू राहील.


नागरिकांनी दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

000000

 शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त 24 जानेवारी रोजी भव्य मिरवणूक


मिरवणूकीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी व फुलांची सजावट


नांदेड, दि. २२ जानेवारी :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमस्थळी दोन्ही दिवस श्री गुरुग्रंथ साहिब विराजमान राहणार आहेत. 

या अनुषंगाने 24 जानेवारी रोजी सकाळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा ते मोदी मैदान पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असून त्यावर हेलिकॉप्टरने पुष्पृष्टी करण्यात येणार आहे. संपूर्ण मिरवणूक मार्ग फुलांनी सजविण्यात येणार आहे.

ही भव्य मिरवणूक भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती व आध्यात्मिकतेचा अविस्मरणीय अनुभव ठरणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा; 


भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


नांदेड दि.२२ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम असर्जन परिसरातील मोदी मैदानावर संपन्न होणार आहे.

या पावन शहीदी समागमास नांदेड शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोयीसाठी नांदेड शहर व परिसरातील विविध गावे व ठिकाणांहून कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी २०० पैक्षा अधिक वाहनांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. यात स्कुलबस व इतर वाहनांचा समावेश आहे.

या मोफत वाहतूक सुविधेमुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ व वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचता येणार असून, ज्येष्ठ नागरिक, महिला व कुटुंबीयांसाठी ही व्यवस्था विशेष लाभदायक ठरणार आहे.

तरी सर्व भाविक व नागरिकांनी या मोफत वाहतूक सुविधेचा लाभ घ्यावा व धर्म, मानवता आणि बलिदानाच्या या ऐतिहासिक शहीदी समागम कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.

००००००

 श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम पार्श्वभूमीवर २४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी


नांदेड दि.२२ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त असर्जन परिसरातील मोदी मैदानावर भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पावन शहीदी समागमासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक नांदेड येथे उपस्थित राहणार असल्याने शहर व तालुक्यात मोठी वर्दळ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी तसेच वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक व नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, तसेच कार्यक्रमाचे आयोजन सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडावे, हा यामागील उद्देश आहे.

तरी सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा व धर्म, मानवता आणि बलिदानाच्या या ऐतिहासिक शहीदी समागमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.

०००००


 ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचा ३५० वा शहीदी दिन – महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे मनिंदर पाल सिंग यांच्याकडून कौतुक


पुणे , दि. २२ (जिमाका वृत्तसेवा):‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस मनिंदर पाल सिंग यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे मनापासून अभिनंदन केले.

आज पुणे ग्रँड टूरच्या तिसऱ्या टप्याचे सासवड ते बारामती हे १३७ किलोमीटरच्या स्पर्धेच्या वेळी ही प्रतिक्रिया दिली.

नांदेडच्या पवित्र भूमीवर श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या विचारांचा आणि बलिदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. गुरु तेग बहादूरजींनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी दिलेले बलिदान सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे ग्रँड टूरचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, गुरु तेग बहादूरजींची विचारधारा ही समाजात एकता, बंधुभाव आणि धार्मिक सौहार्द टिकवण्याची प्रेरणा देणारी आहे. त्याच विचारधारेतून सायकलिंगच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील जनतेने तसेच प्रशासनाने गुरुजींच्या विचारांचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मनिंदर पाल सिंग यांनी आभार मानले. नांदेड येथे २४ तारखेला होणारा मुख्य सोहळा यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुरु तेग बहादूर साहेब यांनी दिलेला धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असून, तो खेळाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवला जात आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

*******

 हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांतून ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी


हिंगोली, दि. २२ (जिमाका) : ‘हिंद दी चादर’ या नांदेड येथे‌ आयोजित गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक व सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून विविध स्तरावर व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज व बॅनर लावून कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यात आली असून नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला, घोषवाक्य लेखन आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, देशभक्ती व ऐतिहासिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव देवेंद्र फडणवीस, नरहरी झिरवाळ तसेच राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमांमुळे ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा संदेश घराघरात पोहोचत असून सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक जाणीव व राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

**** 




नैसर्गिक आपत्ती, अनुदानासाठी तात्काळ  ईकेवायसी करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



• जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांची दुचाकीवरून ‘जलजीवन’ कामांची पाहणी


हिंगोली, दि. २२ (जिमाका) : गतवर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान खात्यावर मिळण्यासाठी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. तसेच मुख्यमंत्री पाणंद रस्ते व शेतरस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

या गावभेटी दौऱ्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, संजय कुलकर्णी, विजय बोरोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील माळेगाव, बिबगव्हाण, कळमनुरी, झरा, तुप्पा, नवखा व शिवणी बु. या गावांचा जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी आज गावभेटींवर भर देत दौरा करून ग्रामीण भागातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, महसूल व सेवाविषयक कामांचा सखोल आढावा घेतला.

माळेगाव येथील जलजीवन मिशनची झालेली कामे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दुचाकीवर बसून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

दौऱ्यादरम्यान नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक वितरण प्रणाली, संजय गांधी निराधार योजना आदी योजनांतर्गत प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्वरित निराकरण करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दप्तर तपासणीसह ई-चावडी, ई-हक्क प्रणाली, ई-फेरफार (नोंदणीकृत व अनोंदणीकृत) प्रकरणांची तपासणी करून ती तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. नागरिकांच्या निवेदनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. तसेच तीन स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

तुप्पा येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून केवळ वीज जोडणी अभावी नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावर महावितरणला तात्काळ वीजजोडणी करून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले.

या दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जाणार असून, शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी नमूद केले.

*****









हिंद दी चादर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन



हिंगोली, दि. 22 (जिमाका): हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन दि.24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान, वाघाळा –नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य ॲङ संतोष राठोड यांनी केले आहे. 

नांदेड येथे तख्त श्री हुजूर साहिब हिंद दी चादर, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वी शहीदी राज्यस्तरीय समिती, समस्त गुरु नानक नाम लेवा संगत, शिख, सिकलकर, लभाना, बंजारा, मोहयाल, सिंधी, उदासीन, तथा नामदेव भगत, आणि वाल्मिकी संप्रदाय समाज महाराष्ट्र आयोजित कार्यक्रमात वरील सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे. या भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमातून मानवता, धर्मरक्षण सर्वधर्म समभावाची शिकवण वृद्धिंगत होणार आहे, असे श्री. राठोड यांनी सांगितले. 

 श्री. गुरु तेग बहादूर साहिब यांच्या या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. श्री गुरु तेग बहादूर यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी आणि ते ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सर्वधर्मिय भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन अशासकीय सदस्य ॲङ संतोष राठोड यांनी केले आहे. 

******

21 January, 2026

 हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांची कार्यक्रमस्थळी पाहणी

तयारी अंतिम टप्यात


नांदेड, दि. २१ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नांदेड येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने, त्यांच्या सोयी-सुविधांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मैदानाची सज्जता, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन,लंगर व्यवस्था, मुख्य मंडप आदी बाबींच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. 

भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम वेळेत  पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज असून, कार्यक्रमपूर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००००