08 November, 2016

जिल्ह्यातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2016 साठी
 जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक संपन्न
हिंगोली, दि.08: राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी या 3 नगर परिषदांसाठी दिनांक 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार असून दिनांक 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणूका निर्भयपणे व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संबंधीत विभागांनी योग्य नियोजन करत समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नगर परिषद निवडणूक-2016 च्या जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. भंडारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त निलेश शेवाळकर, आयकर विभागाचे निरीक्षक एच. के. पात्रे, महावितरणचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी, सामान्य प्रशासन विभाग (जि. प.) ए. के. खोकले आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी या समिती सदस्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. भंडारी म्हणाले की, नगर परिषदांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आली असल्याने सर्व यंत्रणांनी आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन व अंमलबजावणी करावी. जिल्ह्यात होत असलेल्या 03 नगर परिषदांच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही निवडणुक आयोगाच्या आदर्श आचासंहितेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. तसेच निवडणूक कालावधीत निवडणुक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक होणाऱ्या नगर परिषदांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांमध्ये मतदानाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना ही यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबंधितांना दिल्या.
 तसेच निवडणुक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, निवडणूक सनियंत्रण समिती, तक्रार निवारण कक्ष, मतदार जनजागृती, भरारी पथक, चेक पोस्ट, निवडणूक काळात काय करावे-काय करु नये, मालमत्तेचे विद्रुपीकरण विरोधी कायद्याची अंमलबजावणी, निवडणूक काळात परवानाधारकांची शस्त्रे जमा करणे, व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, पेड न्यूज आदीबाबतची योग्य अंमलबजावणी संबंधीत निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यावेळी दिले.

***** 

No comments: