29 August, 2017

बकरी ईदकरीता जिल्ह्यात 18 तात्पुरते पशुवधगृह
        हिंगोली, दि.29: बकरी ईद निमित्त जिल्ह्यात तात्पुरते स्वरुपात 18 पशुवधगृह उभारण्यात येणार असुन दि.1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत या पशुवधगृहावर सक्षम पशुवैद्यकिय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असुन या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही राहणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. ए. बी. लोणे यांनी माहिती दिली.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अनिल भंडारी  यांच्या अध्यक्षतेखाली बकरी ईद-2017 साजरा करणे व महाराष्ट्र प्राणी रक्षण  कायदा 1976 व महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायदा 1995 ची अंमलबजावणी करणे बाबत बैठकीत ते माहिती सादर करतांना ते बोलत होते.  यावेळी बैठकीस जिपचे अति मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया,  उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार विजय अवधाने, प्रतिभा गोरे, पी.एस. माचेवाड यांची उपस्थिती होते.
            यावेळी डॉ. लोणे बैठकीत माहिती सादर करतांना  म्हणाले की, जिल्ह्यात बकरी ईद निमित्त मस्तानशहा नगर हिंगोली (शहर), मेहराज ऊलुम मस्जीद हिंगोली (शहर), नर्सी नामदेव, राहोली बु. लिंबाळा मक्ता, औंढा, जवळा बाजार, शिरडशाहापुर, पुसेगांव, केंद्रा बु., कळमनुरी, शेवाळा, जवळा पांचाळ, नगरपालीका, वसमत, शुक्रवार पेठ वसमत, कुरुंदा, गिरगांव, व हट्टा या ठिकाण 18 तात्पुरते पशुवधगृह उभारण्यात येणार आहेत. तसेच गुरांची अवैध वाहतुक होवु नये यासाठी पोलीस विभागामार्फत कन्हेरगांव नाका, जिंतुर पॉईंट, औंढा, वारंगा फाटा, पानकन्हेरगांव, जिंतुर टी पॉईंट वसमत या पाच चेक पोस्टवर तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आल्याची माहिती डॉ. लोणे यांनी दिली.
              महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 दि4.मार्च 2015 मधील कलम 5 अन्वये कोणाताही व्यक्ती राज्यातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही गायीची, वळुची किंवा बैलांची कत्तल करणार नाही किंवा कत्तल करविणार नाही. 5अ (1) कत्तल करण्यासाठी गाय, वळु किंवा, बैल यांची वाहतुक करण्यास प्रतिबंध 5 अ(2) कत्तल करण्यासाठी गाय, वळु किंवा बैल यांची निर्यात करण्यास प्रतिबंध 5 ब गाय, वळु किंवा बैल यांची अन्य कोणत्याही पध्दतीने विक्री, खरेदी करण्यास, विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध आहे. 5 क गाय, वळु किंवा, बैल यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई  5 ड महाराष्ट्र राज्याबाहेर कत्तल केलेली गाय, वळु किंवा बैल यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई. कलम 6 अन्वये म्हशी आणि म्हशींचे पारडे या प्राण्यांची कत्तलपुर्व तपासणी करुन कत्तलीस परवानगी आहे. गाय, वळु आणि बैल हे प्राणी कत्तलीसाठी प्रतिबंधीत आहेत. कलम 10 अन्वये, या अधिनियमातील सर्व अपराध हे दखलपात्र व बंजमानती (Non Bailable) असतील. या बाबीसाठी 10 हजार रुपया पर्यंत दंड व 5 वर्ष करावासाच्या शिक्षेचे प्रावधान असल्याचेही डॉ. लोणे यांनी बैठकीत माहिती दिली.
                  जनतेने या बाबीची दखल घेवुन नियमानुसार व सलोख्याचे वातावरणात बकरी ईद सण साजरा करावा असे आहवान करत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.

****

No comments: