18 April, 2019

हिंगोली लोकसभेसाठी अंदाजे 64 टक्के मतदान


हिंगोली लोकसभेसाठी अंदाजे 64 टक्के मतदान

हिंगोली,दि.18 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून कोणत्याही अनुचित घटनेशिवाय मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 63 ते 64 टक्के मतदान झाले असून 65 टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत सर्व मतदार संघातून आकडेवारी प्राप्त करण्याचे काम सुरु असून, उद्या या संदर्भात निवडणूक आयोगामार्फत अधिकृत आकडेवारी जाहीर होणार असल्याची  माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हिंगोली मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते 9 या दरम्यान 7.68 टक्के मतदान झाले होते. तर सकाळी 11 पर्यंत ही टक्केवारी 20.56 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 34.01 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 45.97 टक्के, सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 56.22 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. तथापि किनवट मतदार संघातील 17 मतदान केंद्र तर हदगाव मधील 16, वसमत मधील 13, कळमनुरी मधील 19 आणि हिंगोली मधील 11 मतदान केंद्र या एकुण 76 मतदान केंद्रावर अद्याप ही मतदान सुरु असून सुमारे रात्री 8 ते 9 पर्यंत हे मतदान संपण्याची शक्यता आहे. या एकुण 76 मतदान केंद्रावरील मतदान संपल्यानंतर रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी प्राप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती ही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली.
आपला मताधिकार अधिकाधिक मतदारांनी बजावावा याकरीता यावेळेस निवडणूक आयोगाने वेगवेगळया उपाय योजना केल्या होत्या. उष्णतेची लाट लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध केल्या होत्या. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर सावलीकरीता मंडप घालण्यात आले होते. यामुळे मतदारांना सोय झाली. याशिवाय पिण्याचे पाणी, निवडणुकीच्या साहीत्यापासून तर मतदान केंद्रावरील रॅम्प, विद्युत व्यवस्था, मेडीकल किट, वाहन, दिव्यांगासाठी व्हीलचेअर या सर्व सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध् करुन देण्यात  आल्या होत्या.
तसेच जिल्ह्यातील सर्व माध्यमांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन, यास विविध माध्यमातून चांगली प्रसिध्दी दिल्याने श्री. जयवंशी यांनी सर्व माध्यम प्रतिनिधीचे यावेळी आभार मानले.

****

No comments: