02 April, 2019


निवडणूक प्रचारासाठी सोशल मिडियाचा

गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई

-        जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

            हिंगोली,दि.2: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता निवडणूकीत भाग घेतलेल्या उमेदवार राजकीय पक्षांच्या पेड न्युजवर चोख लक्ष ठेवून दैनंदिन प्रसिध्द होणाऱ्या मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमातील संशयीत पेड न्यूज किंवा इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमातील प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती प्रसिध्दी झाल्याचे निदर्शानास आल्यास कार्यवाही करून संबंधीतास नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.
     मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचार सहिंतेचा भंग होवू नये, यासाठी माध्यम प्रमाणन सनियंत्रण समिती (मिडीया सर्टिफिकेशन ॲन्ड मॉनीटरींग कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमाचा प्रचार-प्रसिध्दी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या गैरवापरावर आणि पेड न्यूजवर हि समिती लक्ष्य ठेवणार आहे. याकरीता लोकसभा निवडणूक कालावधीत समितीचे सदस्य असलेले मतदार संघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि सदस्य यांची वेळोवेळी बैठक बोलवून मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल माध्यमातील प्रसिध्द होणाऱ्या वृत्त आणि जाहिरातींबाबत वेळोवळी आढावा घेवून आचार संहितेचा भंग करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जयवंशी यांनी दिल्या आहे.
    निवडणूकीतील सर्व उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमात (सोशल मिडिया) सर्व प्रकारच्या जाहिराती प्रसिध्दी करण्यापूर्वी सदर जाहिराती माध्यम प्रमाणन सनियंत्रण समिती (मिडीया सर्टिफिकेशन ॲन्ड मॉनीटरींग कमिटी) यांच्यामार्फत प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच प्रमाणीत न करता प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीबाबत संबंधीतावर कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्‍ह्यात वर्तमान पत्रामध्‍ये प्रसिध्द होणाऱ्या बातम्‍या, लेख तसेच समाज माध्‍यमांतील व्‍हॉट्स अॅप ग्रुपवरील विनापरवानगी पोस्‍ट, मोबाईलद्वारे बल्क एस.एम.एस. अथवा प्रचार करणाऱ्या तसेच सेवा पुरवणाऱ्या संस्थावर कारवाई करण्‍याच्‍या सुचना ही जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिल्या.
****

No comments: