05 April, 2019

सोशल माध्यमावर विना परवानगी प्रचार करणाऱ्या उमेदवारांना नोटीस


सोशल माध्यमावर विना परवानगी प्रचार करणाऱ्या उमेदवारांना नोटीस

            हिंगोली,दि.5: आगामी लोकसभा निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली असून, या निवडणूकीत राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून प्रचार-प्रसिध्दीसाठी माध्यमाचा गैरवापर होवू नये याकरीता जिल्‍हा माध्‍यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या जिल्‍हा माध्‍यम प्रमाणन व संनियंत्रण समितीमार्फत हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता निवडणूकीत भाग घेतलेल्या राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या दैनंदिन प्रसिध्द होणाऱ्या मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमातील संशयीत पेड न्यूज आणि जाहिरातीवर लक्ष ठेवण्‍यात येत आहे. मतदार संघातील काही उमेदवारांनी समितीकडून प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती/मजकूर समाज (सोशल मिडिया) माध्यमाद्वारे प्रसिध्द केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन संनियंत्रण समितीने चार उमेदवारांना नोटीस देण्याचा निर्णय घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षेत संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन संनियंत्रण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रविण फुलारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उमरखेड आणि किनवट यांचे प्रतिनिधी, समिती सदस्य डॉ. विजयकुमार कानवटे, आकाशवाणी कार्यक्रम प्रमुख सतीष जोशी, सोशल मिडिया तज्ज्ञ रोहित कनसे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मिडियावर जाहिरात किंवा इतर  मजकुर प्रसारित करण्यापूर्वी जिल्‍हा माध्‍यम प्रमाणन व संनियंत्रण समितीमार्फत  सदर जाहिरात/मजकुर प्रमाणित करुन घेण्याचे मा. निवडणूक आयोगाचे निर्देश आहे.  परंतू काही उमेदवारांनी किंवा त्यांच्या सोशल मिडियातील मित्रांनी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन संनियंत्रण कक्षामार्फत प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती/मजकुर (व्हिडिओ) या सोशल मिडियावर प्रसारित केल्याचे सोशल मिडिया तज्ज्ञ यांच्या निदर्शनास आल्याने याबाबतचा अहवाल समिती पूढे सादर करण्यात आला. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुभाष वानखेडे, शिवसेना पक्षाचे हेमंत पाटील,  बहूजन मुक्ती पार्टीच्या वर्षा देवसरकर आणि वंचीत बहूजन आघाडी पक्षाचे मोहन राठोड या चार उमेदवारांच्या जाहिराती/मजकूर (व्हिडिओ) हे माध्यम प्रमाणन सनियंत्रण समिती यांच्यामार्फत प्रमाणित करुन न घेता सदर उमेदवार किंवा त्यांचे सोशल मिडियातील मित्र यांच्या मार्फत समाज माध्यमात प्रसारित करण्यात आल्याचे समितीच्या निदर्शनास आले. याकरीता समितीने संबंधीत उमेदवारांना सदर जाहिरात/मजकूर हा माध्यम, प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन न घेता का प्रसिध्द केला ? तसेच या जाहिरातीचा खर्च आपल्या खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये, याकरीता नोटीस बजावून त्यांच्या खुलासा मागविला आला आहे.
उमेदवारांचे फेसबुक, व्टिटर, इन्‍स्‍टाग्राम, युट्युब, व्‍हॉट्स अॅप या समाज माध्‍यमातून आक्षेपार्ह मजकूर अथवा व्हिडीओ/ ऑडिओ क्लिप मजकूर यासंदर्भात समितीने लक्ष ठेवून अहवाल सादर करावा तसेच विना परवानगी प्रचार करणाऱ्यावर कारवाई करावी. तसेच नागरिकांना कोणत्याही समाज माध्यमात निवडणूक विषयक आक्षेपार्ह जाहिरात/मजकूर निदर्शनास आल्यास, नागरिकांनी जिल्हा प्रशासनास किंवा 1950 या टोल फ्रि क्रमांकावर कळवावे असे आवाहन ही जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी यावेळी केले.
****

No comments: