24 April, 2019

जलजन्य आजार व दुषित पाण्यामुळे होणारे साथींचे आजार टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन



जलजन्य आजार व दुषित पाण्यामुळे होणारे साथींचे आजार
टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन
        हिंगोली,दि.24: महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या तीव्र उन्हाळा जानवत असून काही गावात पुढील काळामध्ये पाणी टंचाई बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा पाणी टंचाईच्या काळात लोक उपलब्ध होईल तेथील पाणी पिण्यासाठी वापरतात. अशावेळी आपण पिण्यासाठी वापरत असलेले पाणी दुषित तर नाही ना याची खात्री करुनच ते पिण्यासाठी वापरावे. सदरचे पाणी जर दुषित असेल तर त्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर व इतर पोटाचे विकार होण्याची किंवा साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.           
            वरील जलजन्य आजार व दुषित पाण्यामुळे होणारे साथींचे आजार टाळण्यासाठी जनतेने पुढील प्रमाणे काळजी घ्यावी - आपल्या गावात टॅंकरने पाणी पुरवठा होत असल्यास त्या पाण्याचे ब्लिचिंग पावडर द्वारे शुध्दीकरण झाले आहे किवा नाही याची खात्री करावी, गावामध्ये विहीर, हातपंप किंवा नळ योजनेमार्फत पाणी पुरवठा होत असल्यास पुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतांचे नियमित पाणी शुध्दीकरण होते किंवा नाही याची खात्री करावी, हॉटेल्स, रसवंती या सारख्या ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्यास तसेच अशुध्द पाणी पुरवठा आढळून आल्यास अशा ठिकाणचे पदार्थ खाणे/पिणे टाळावे, लहान मुलांना आईस्‍क्रीम,  बर्फ गोळे उघड्यावरील पदार्थ खावू घालणे टाळावे, पिण्यासाठीचे पाणी उकळून व गाळून प्यावे, दुषित पाण्यामुळे साथसदृष्य परिस्थिती आढळून आल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी  संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****


No comments: